गोंदिया : राज्यासह जिल्ह्यात सुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच ग्रामीण भागातील काही झोलाछाप व डिग्री नसलेल्या डॉक्टरांनी गावात कोविड रुग्णांवर उपचार करणे सुरू केले असून, त्यांना प्रिस्क्रिप्शनवर रेमडेसिविर इंजेक्शन लिहून देत आहे. दरम्यान, रविवार गोंदिया तालुक्यात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाने याची दखल घेत संबंधित झोलाछाप व डिग्री नसलेल्या डॉक्टरांवर धाड टाकून कारवाई करण्यास प्रत्येक तालुक्यातील आरोग्य अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने बहुतेक जिल्ह्यात त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्याचा फायदा काही औषध विक्रेते घेत असून, या इंजेक्शनची ७ ते ८ हजार रुपयांना विक्री करीत आहे. यासंबंधीच्या तक्रारीत वाढ झाल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी शुक्रवारी शहरातील मेडिकलला भेट देऊन रेमडेसिविर इंजेक्शन आणि कोविडवरील उपचाराच्या औषधांचा साठा चेक केला होता. तसेच साठ्यामध्ये तफावत आढळल्याने मेडिकल संचालकाला कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजाविली होती. तसेच शहरातील सर्वच स्टॉकिस्टला रेमडेसिविर इंजेक्शन व इतर औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्यास सांगून त्याचा तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. मात्र आता पुन्हा एक नवीनच समस्या प्रशासनासमोर निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील काही झोलाछाप डाॅक्टरांनी कोरोना रुग्णांवर आरोग्य विभागाची परवानगी न घेता उपचार सुरू केले आहेत. एवढेच नव्हे तर कोरोनाबाधित रुग्णांना प्रिस्क्रिप्शनवर रेमडेसिविर हे इंजेक्शन सुद्धा लिहून देत आहे. ग्रामीण भागातील एका डॉक्टरने लिहून दिलेली चिठ्ठी मेडिकलच्या डॉक्टरांच्या हाती लागली. त्यानंतर त्यांनी याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठांना ही बाब लक्षात आणून देत संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता या नव्या प्रकाराने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
...........
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी घ्यावी लागते परवानगी
ग्रामीण भागातील काही डाॅक्टरांनी कोरोना रुग्णांवर स्वत:च्या मर्जीने उपचार करणे सुरू केले आहे. मात्र यासाठी आरोग्य विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे तसेच यासाठी आरोग्य विभागाने घालून दिलेल्या निकषांची पूर्तत: करणे गरजेचे आहे. तसेच रेमडेसिविर इंजेक्शन देताना रुग्णाला निरीक्षणाला खाली ठेवावे लागते, तसेच त्याच्या सर्व तपासण्या सुद्धा कराव्या लागतात. त्याशिवाय हे इंजेक्शन देता येत नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.