महाड दुर्घटना पुनरावृत्तीची भीती : ब्रिटिशकालीन पुलाचे भयावह वास्तव, पुलावरून होते रेती तस्करीची वाहतूक प्रशांत देसाई भंडारा भंडारा : राज्यात अनेक ठिकाणी ब्रिटीशकालीन पुलांनी शतकोत्तरी गाठली असून या पुलांची आयुमर्यादा संपली आहे. असे असतानाही या पुलावरून आजही मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथे मंगळवारी मध्यरात्री ब्रिटीशकालीन पुल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. दरम्यान या पुलावरून मार्गाक्रमण करणारे वाहन व त्यातील २२ प्रवाशांना जलसमाधी मिळाली. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील कारधा पुल आणि तुमसर तालुक्यातील माडगी येथील पुलाची पाहणी केली असता, या पुलावरूनही वाहनचालकांचा दररोजचा ‘जीवघेणा’ प्रवास सुरू असल्याचे वास्तव दिसून आले आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजांनी भारतात पायमुळ रोवली. त्यानंतर त्यांना येथे राज्य करताना, दळणवळाच्या सोयीअभावी त्रास होत असल्याने ब्रिटिशांनी रस्ते व नदींवर पुलांची निर्मिती केली. कालांतराने ब्रिटीशांनी भारत सोडले तरी, त्यांनी निर्माण केलेले पुल आजही त्यांच्या आठवणीत उभे आहेत. या पुलांच्या निर्मितीला आता शंभर वर्षांचा कालखंड झालेला आहे. तर काही पुल नव्वदीत आहेत. भंडारा जिल्ह्यातही ब्रिटिशकालीन पुल आता शेवटची घटका मोजत असल्या तरी या पुलांवरूनच वाहतूक सुरू असल्याची गंभीर बाब आहे. भंडारा व कारधा या गावांच्या मधोमध वैनगंगा नदी आहे. या दोन्ही गावांना जोडण्यासाठी ब्रिटीशांनी पुलाची निर्मिती केली आहे. हा पुल सन १९०० ला दळणवळणासाठी सुरू करण्यात आला होता. सध्या हा पुल ११६ वर्षांचा झाला आहे. पुलाची कालमर्यादा झाली असल्याने वाहतुकीसाठी योग्य नसल्याने यावरील वाहतूक बंद करावी, असे पत्र ब्रिटीश सरकारने भारत सरकारला दिले. त्यानंतर या पत्राची अनेक ठिकाणी अंमलबजावणी करण्यात आली. तर कुठे त्यांची दखल न घेतल्याने आजही वाहतूक सुरू आहे. या मार्गावरून वर्दळ करणे धोकादायक असल्याने हा प्रवास जीवघेणा प्रवास ठरू शकतो. कमकुवत पुलावरून होतेय वाहतूक हा पुल वाहतुकीसाठी सन १९०० ला पुल बांधकाम करण्यात आले. या पुलाला आता ११६ वर्षे पुर्ण झाली आहे. त्यामुळे पुलाचा आयुर्मान संपलेला आहे. अशा स्थितीतही या पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. या पुलावरील वाहतुकीला अडचण नसली तरी तो धोकादायक आहे. ब्रिटीश सरकारने पुलांचा आयुर्मान संपल्याचा पत्रव्यवहार केलेला आहे. या पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली असली तरी, दुचाकी व छोट्या वाहनांची वाहतूक सुरू आहे.
कालबाह्य पुलावरून ‘जीवघेणा’ प्रवास
By admin | Published: August 05, 2016 1:43 AM