इटखेडा : जिल्ह्यातील १०६ गावामध्ये जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात आला. त्यानुसार प्रत्येक गावातील महिला सबलीकरण समितीला शासनाकडून बचत गटाच्या माध्यमातून बीज भांडवल म्हणून महिला बचत गटांना वाटप करण्यासाठी निधी प्राप्त झाला. तो निधी त्या महिला सबलीकरण समितीकडे कायमस्वरूपी ठेवण्याचे धोरण आहे. यात फक्त महिला सबलीकरण समिती जलस्वराज्य प्रकल्प महागावच्या समितीनेच बीज भांडवल वाटप वसुलीचे काम सुरू ठेवले आहे. महिला सबलीकरण समितीचा पारदर्शक कारभार, सहभागी सर्व महिलांचा प्रामाणिकपणा, बीज भांडवलाची उचल करून नियमितपणे परतफेड करण्याची सवय यामुळे हे शक्य झाल्याचे उद्गार मार्गदर्शक आर.के. देशमुख यांनी काढले. ते महिला सबलीकरण समिती जलस्वराज्य प्रकल्प महागावच्या वतीने आयोजित महिला बचत गटाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महिलांना मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी सरपंच पपिता जांभुळकर होत्या. याप्रसंगी उमेद मधील झेप ग्रामसंघाच्या अध्यक्ष आशा देशमुख, सचिव हेमलता डोंगरवार, भरारी ग्राम संघाच्या अध्यक्षा निकिता भजने, सचिव रसिका शहारे व तंसुमता साखरे उपस्थित होते. प्रारंभी समितीच्या सचिव मंगला रामटेके यांनी बीज भांडवल वाटप व वसुलीचा आढावा सादर करीत बचत गटाकडून समितीला व्याजाच्या रुपाने ३ लाख ५६ हजार ९८२ रुपये प्राप्त झाल्याचे सांगितले. याप्रसंगी सुनंदा फुलबांधे, मालन देशपांडे, शोभा मेश्राम, गोदावरी पालीवाल, पूजा देशकर, ज्योती जांभुळकर, कल्पना साखरे, निवृत्ती डोंगरवार, इंदू झोडे, कविता मेश्राम, तिरंगना जांभूळकर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
जलस्वराज्य प्रकल्पाचा उपक्रम
By admin | Published: February 02, 2017 1:04 AM