लोकमत न्यूज नेटवर्क खातिया : सुमारे २५ हजार लोकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या कामठा येथील आरोग्य केंद्राला रिक्त पदांच ग्रहण लागले आहे. परिणामी केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसून प्रभारी वैद्यकीय अधिकारी केंद्राचा कारभार चालवीत आहेत. शिवाय आरोग्य सेविकांसह अन्य पदे रिक्त पडून आहेत. त्यामुळे केंद्रांतर्गत येत असलेल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून केंद्रातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली जात आहे. कामठा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कामठा, छिपीया, पांजरा, खातीया, मोगर्रा, कटंगटोला, लंबाटोला, परसवाडा, सिंधीटोला ही गावे येत असून सुमारे २५ हजार लोकांच्या आरोग्याची जबाबदारी केंद्रावर आहे. आता पावसाळा सुरू होणार असून बदलत्या वातारणामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. परिणामी आरोग्य केंद्रात उपचारासाठी लोकांची गर्दी वाढू लागली आहे. ग्रामीण भागातील गरीब जनतेच्या सोयीसाठी आरोग्य केंद्र शासनाकडून चालविले जाते. असे असताना मात्र कामठा येथील आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद असूनही कायम वैद्यकीय अधिकारी नाहीत. केंद्राचा कारभार प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलरवार चालवित आहेत. शिवाय एमपीडब्ल्युचे (मलेरिया विभाग) पद ही रिक्त असून आरोग्य सेविकांचीही आवश्यकता आहे. या विषयाला घेऊन रूग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य कुंदन कटारे व विजय लोणारे यांनी आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्यात यावी यासाठी संबंधीतांकडे मागणी केली असल्याचे सांगीतले.
कामठा आरोग्य केंद्राला डॉक्टरांची गरज
By admin | Published: June 01, 2017 12:58 AM