गोंदिया : नक्षलवादाच्या समस्येशी तोंड देत असलेल्या बालाघाट जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवादाच्या निर्मुलनात व्यस्त असलेल्या हॉकफोर्सला शुक्रवारी (दि.२९) आणखी एका मोठ्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात यश आले. २५ वर्षीय मलाजखंड दलमचा नक्षलवादी कमलू हा हॉकफोर्ससोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. कमलूवर १४ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
हॉकफोर्सचे जवान जंगलात शोध मोहीम राबवित असताना त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली हे सर्व नक्षलवादी मलाजखंड दलमचे सक्रिय सदस्य होते. या चकमकीत नक्षलवाद्यांनी जवानांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हॉकफोर्सने केलेल्या गोळीबारात नक्षलवादी कमलू ठार झाला. ही घटना २९ सप्टेंबर रोजी बालाघाट जिल्ह्यातील रूपझर पोलिस ठाण्याअंतर्गत कडला येथील जंगलात, कुंदल-कोद्दापार या ठिकाणी घडली. बालाघाट पोलीस ठाण्याअंतर्गत हे या वर्षातील तिसरे मोठे यश आहे. या पूर्वी २२ एप्रिलला प्रत्येकी १४ लाख रुपये बक्षीस असलेल्या एक महिला नक्षलवादी क्षेत्र कमांडर टांडा दलमची सुनीता आणि टांडा दलममधील एरिया कमांडर आणि सध्या विस्तार दलममध्ये कार्यरत असलेल्या नक्षलवादी कबीरच्या गार्ड असलेल्या खटिया मोचा दलममधील सरिता यांनाही चकमकीत ठार करण्यात आले होते. त्यांच्याकडून बंदुका, काडतुसे, मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांची शस्त्रे आणि खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले होते.
२९ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा हॉकफोर्स व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात हॉकफोर्स जवानांनी शौर्य दाखवून १ नक्षलवादी कमलूला ठार केले. कमलूकडे असलेली ३०-०६ रायफल जप्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलीस महानिरीक्षक संजय कुमार, बालाघाट जिल्हा पोलिस अधीक्षक समीर सौरभ यांनी पोलिस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन या घटनेला दुजोरा दिला.
हॉकफोर्सने केली शोध मोहीम तीव्र
या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर या घनदाट परिसरातील जंगलात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.