बाराभाटी : बहुजनांच्या उत्थानासाठी ज्या महापुरुषांनी लढा देऊन, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय्य हक्काची जाणीव करून दिली, त्या महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन, जिल्ह्यातील मागासवर्गीय शिक्षक कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना सदैव तत्पर असेल, असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सु.मो.भैसारे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अर्जुनी मोरगाव तालुकाध्यक्ष राजेश साखरे, नवनियुक्त तालुका सरचिटणीस जगदीश मेश्राम, मुख्य संघटन सचिव संचित वाळवे, उपाध्यक्ष पुणाराम जगझापे, कोषाध्यक्ष तेजराम गेडाम, अतिरिक्त उपाध्यक्ष नागेंद्र खोब्रागडे, कार्यालयीन सचिव नेतराम मलगाम, प्रकाश सांगोडे, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर उके, परसराम राऊत, रामू फरदे आदींना शिक्षक संघटनेच्या घटनेतील तरतुदीनुसार, प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, पुढील दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. ही सभा नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरात मंगळवारी घेण्यात आली. भैसारे म्हणाले की, मागासवर्गीय म्हणजे केवळ अनु. जाती, अनु.जमाती, विभज, विमाप्र यांचाच समावेश होत नसून, समाजातील बहुसंख्येने असणारा इमाप्रचासुद्धा समावेश आहे. या बहुसंख्य समाजातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत अध्ययनरत आहेत. त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षक बांधवांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन केले, तसेच या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी संघटित होऊन निकराने लढा दिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सांगोडे यांनी केले तर आभार परसराम राऊत यांनी मानले.