गोंदिया : आपला व्यवसाय बुडेल, या भीतीने शहराच्या गणेशनगरातील अशोक बाबुलाल कौशिक (४५) यांचा खून करण्यासाठी ५ लाखांची सुपारी देण्यात आली. त्या सुपारीचे २ लाख २० हजार रुपये आरोपीला मिळाले. सुपारी घेऊन अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता खून करण्यात आला. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. या आरोपींना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण न झाल्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत पुन्हा न्यायालयाने वाढ करून १ सप्टेंबरपर्यंत केली होती. आता त्या तिघांची जिल्हा सत्र न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे.
गोंदिया शहरातील एनसीसी ट्रान्सपोर्टचे मालक अशोक बाबुलाल कौशिक (४५) हे आरोपी चिंटू शर्मा (३५) रा. सर्कस ग्राऊंडजवळ, गोंदिया याच्या जिममध्ये जात होते. काही दिवसांपासून अशोक कौशिक नवीन टेक्नॉलॉजीची जिम चिंटू शर्मा यांच्या जिमच्या बाजूलाच टाकणार होते. यामुळे आपला व्यवसाय बुडेल, या भीतीने चिंटू शर्मा याने पाच लाखात अशोक कौशिक यांची सुपारी दिली. आरोपी सतीश बनकर (३०) रा. छोटा गोंदिया याने ही सुपारी पाच लाखात घेतली होती. त्या पाच लाखांपैकी २ लाख २० हजार रुपये सतीशला आरोपी दीपक भुते (३२) रा. छोटा गोंदिया याने नेऊन दिले होते. मागील तीन महिन्यांपासून २ लाख २० हजार रुपये टप्प्याटप्प्याने आरोपी बनकरला देण्यात आले होते. एका मोटारसायकलवर जाऊन सतीश बनकर याने २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता गोंदियाच्या सर्कस मैदानावर मॉर्निंग वाॅक करीत असताना अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून त्यांचा खून केला. या प्रकरणात आरोपी सतीश बनकर, जिम चालक चिंटू शर्मा व जिममधील असिस्टंट दीपक भुते या तिघांना गोंदिया शहर पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी अटक केली होती. या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा झाला नसल्याने न्यायालयाने त्या आरोपींची आता तुरुंगात रवानगी केली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी दिली आहे.