विजय मानकर सालेकसा आपल्या विविध कला गुणांच्या आधारावर आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. कित्येक बाबतीत त्या पुरुषांपेक्षा काही पटींनी पुढे असल्याचे अनेक वेळा सिद्ध करून दाखविले आहे. शिक्षण घेऊनच नाही तर कमी शिक्षित असलेल्या महिलासुद्धा आपल्या अंगातील गुण व क्षमतेचा पुरेपूर उपयोग करीत धाडसी कार्य करीत असताना दिसत आहेत. तालुक्यातील महिलांनी आता बचत गट व इतर सामाजिक जाणीव-जागृतीचा आधार घेत कोणत्याही कामात आम्ही मागे नाहीत हे दाखवून दिले आहे. सालेकसा तालुक्यात एकूण १ हजार १८८ बचत गटाच्या माध्यमातून जवळपास १५ हजार महिला विविध व्यवसाय करीत आत्मनिर्भरतेच्या वाटेवर वाटचाल करीत आहेत. यात जवळपास दोन हजार महिला तर पुरुषांवर भारी पडत आहेत. पूर्ण क्षमतेने विविध व्यवसाय करीत कुटुंबाचे संगोपन, मुलांचे शिक्षण, आरोग्य, लग्न कार्य, सामाजिक उपक्रम इत्यादीच्या बाबतीत समृद्ध झाल्याचे दिसून येते. स्वत:च्या कमाईने अंगावरील दागिने बनविणे, बचत करणे वेळप्रसंगी कोणतीही आर्थिक अडचण भागविणे यात महिला आघाडीवर आल्या आहेत. सालेकसा तालुक्यात ज्या महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत त्या उपजिवीकेच्या व्यवसायातून आपला दर्जा वाढविताना दिसत आहेत. या शेती व शेतीपुरक व्यवसाय महत्वाचे व लाभदायक ठरत आहे. यात शेळी पालन, दुग्ध संकलन केंद्र, अगरबत्ती प्रक्रिया, खत प्रक्रिया, मत्स्यपालन, सिंगाडा उत्पादन, कुक्कूट पालन, भाजीपाला लागवड, हळद लागवड, त्याचबरोबरची वस्तू विक्रीची दुकाने, कृषी केंद्र इत्यादी व्यवसायात हजारो महिला जबाबदारीने काम सांभाळत आहे. तालुक्यात ४६ गावांत शेळीपालन व्यवसाय सुरु असून यात एक हजार १७३ महिला आर्थिक देवाण-घेवाण करीत आहेत. १३ गावांमध्ये २६६ महिलांना स्वत:च्या घरी गावी म्हशी पालन करीत त्याची देखरेख करणे, दुध काढणे, दुधाचे संकलन करीत डेअरीवर नेणे, पशु आहार खरेदी करुन आणने, जनावरांसाठी गवत आणने, इत्यादी सर्व कामे पुरुषाच्या मदतीविणा यशस्विरित्या करीत आहेत. सात गावामध्ये गाव तलावात मत्स्य पालन सुरु असून एकूण ४४ महिला मत्स्य पालन केंद्राची पूर्ण जबाबदारीने निगा राखत मत्स्य व्यवसाय करीत आहेत. दरबडा, धानोली, परिसरात चार गावामध्ये ७८ महिलांनी तर आपल्या कलाकुशलतेचा उपयोग करीत गावात हरितक्रांती घडवून आणली आहे. १० गावामध्ये कुक्कूट पालन सुरु असून या सर्व ठिकाणी जवळपास २३५ महिला यशस्वी कामगिरी बजावत आहेत. या व्यतिरिक्त अगरबत्ती प्रक्रियेत १६ महिला, रव्वा प्रक्रियेत १५ महिला, सिंगाडा उत्पादनात ११ महिला लाख उत्पादन ४७ महिला हळद प्रक्रियेत ७१ महिला पुरुषांच्या शिवाय संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. ३४ गावामध्ये रब्बी, खरीप दोन्ही हंगामात ९९८ महिला शेतकरी श्री पद्धतीने भात लागवड भात पिकाचे भरघोस उत्पादन घेत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून आज सर्वच वर्गातील महिला विविध प्रकारच्या कामाद्वारे स्वालंबी झाल्या आहेत. यात अनुसुचित जातीच्या १५३७, असुनूचित जमातीच्या ३७४५ महिला, भटक्या जातीच्या ७४८ महिला, इतर मागास वर्गाचे ७२७३ महिला तसेच अल्पसंख्याक समाजातील सुद्धा २४६ महिला घराबाहेर निघून स्वावलंबनाच्या मार्ग पकडला आहे. इतर सामान्य वर्गातील एक हजार २३२ महिला असे एकूण १४ हजार ६९१ महिला कोणत्या ना कोणत्या व्यवसायात स्वत:ची क्षमता व बुद्धीचा वापर करीत असताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब आता गरिबीच्या विळख्यातून बाहेर निघताना दिसत आहेत. इतर व्यवसायांसोबत लाख उत्पादन यासारखे सुक्षम उपजिवीकेचे व्यवसाय फारच प्रभावी ठरत आहेत. दिव्यांग महिलांचाही समावेश विविध कामात यशस्वी कामे करीत असलेल्या महिला आपल्या मुला-मुलींना चांगल्या इंग्रजी शाळेत शिकवित असून व्यवसायीक शिक्षण उपलब्ध करवून देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या भरपूर पाठपुरावा करीत आहेत. एवढेच नाही तर गावात कोणालाही कोणतीही अडचण आली तर त्याला पटकन मदतीचा हात समोर करीत आहेत. दिव्यांग महिलाही आपल्या कलागुणांचा उपयोग करीत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या वाटेवर आहेत. तालुक्यातील जवळपास २५ दिव्यांग महिला शेतीपुरक व्यवसाय करीत असून स्वावलंबनाच्या मार्गावर आहेत.
बचत गटाने केला प्रगतीचा मार्ग मोकळा
By admin | Published: March 08, 2017 12:58 AM