लोकमत न्यूज नेटवर्क
केसलवाडा : केसलवाडा ते येडमाकोट हा ३ किलोमीटरचा रस्ता खराब झाला असून, रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. हा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे. केसलवाडा हे गाव मिनी बाजारपेठ असल्यामुळे येडमाकोट, सेलोटपार, मुरपार, लेदडा व बयवाडा या गावातील लोकांची नेहमीच ये-जा सुरु असते. रस्ता उखडल्यामुळे या मार्गावर सुरु असलेली केसलवाडामार्गे तिरोडा ते तुमसर ही तिरोडा आगाराची बस मागील बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना फारच त्रास सहन करावा लागत आहे. या उखडलेल्या रस्त्यावर केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात काही विपरीत घडले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
केसलवाडा येथे शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय असल्यामुळे येडामाकोट येथील लोकांना केसलवाडा येथे नेहमी यावे लागते. अशास्थितीत प्रवास करायला फारच त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे देशात फोर-वे व सिक्क-वेचे काम सुरु असताना ग्रामीण भागातील रस्त्यांची अशी दुरवस्था का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हा बिकट प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित गावातील राजकारण्यांनी राजकारण बाजूला ठेवून उदार मनाने पुढे येऊन प्रशासनावर दबाव टाकण्याची गरज आहे. यातून तरी रस्ता दुरूस्ती होईल, अशी आशा नागरिकांना आहे.