लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : घाटकुरोडा ते घोगरा तसेच देव्हाडा (खुर्द) रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले असून ते अपघाताला आमंत्रण देत आहेत.सदर रस्ता काही वर्षांपूर्वी डांबर व गिट्टी टाकून तयार करण्यात आला होता. परंतु आता या रस्त्यावरील डांबर व गिट्टीचा पत्ताच नाही. रस्ता पूर्णपणे उखडला आहे. ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे चारचाकी वाहन, दुचाकी वाहन जाताना खड्यांतील खराब पाणी येणाºया जाणाºया लोकांच्या कपड्यावर उडून कपडे खराब होतात. रस्ता एकेरी असल्यामुळे अनेकांना वाहन जाईपर्यंत रस्त्याच्या कडेला थांबून आपला वेळ घालवावा लागतो.या रस्त्यांनी घाटकुरोडा व घोगरा येथील नागरिक मुंडीकोटा येथे सोमवारचा आठवडी बाजार, बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, विद्यार्थी व शेतकरी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे या रस्त्याने तुमसर आगाराची प्रवासी बस देव्हाडा मार्गे घोगरा ते घाटकुरोडा रस्त्याने तिरोड्याकडे जाते. तसेच तिरोडा आगाराची स्कूल बस सकाळी ७ वाजता विद्यार्थ्यांना नेण्याकरिता घोगरा या गावापर्यंत येते. घोगरा येथूनच परत सरळ तिरोड्याकडे जाते. ही बस दिवसातून दोनदा येते. तसेच तुमसर आगाराची प्रवासी बस दिवसातून दोनदा तिरोड्याकडे प्रवासी घेवून जाते. पण रस्ता पूर्णपणे खराब झाला असल्यामुळे ही बस सेवा बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.खड्डयांमुळे रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. या रस्त्याने घाटकुरोडा गावातून दुचाकी वाहन घेवून बाहेर निघणे कठीण झाले आहे. गावाच्या बाहेर निघणे म्हणजे तारेवरची कसरत, अशी रस्त्याची स्थिती आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दयनीय अवस्था दूर करावी, रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाकडे केली आहे.
घाटकुरोडा ते घोगरा रस्त्यावर खड्डेच खड्डे रस्त्याची दुरवस्था : एसटी बस सेवा बंद होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 9:27 PM
घाटकुरोडा ते घोगरा तसेच देव्हाडा (खुर्द) रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले असून ते अपघाताला आमंत्रण देत आहेत.
ठळक मुद्देसंपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले असून ते अपघाताला आमंत्रण देत आहेत