देवरी : तालुका महिला काँग्रेसच्यावतीने आणि आमदार सहषराम कोरोटे यांच्या धर्मपत्नी सीमा कोरोटे यांच्या संकल्पनेतून ‘खाकी विथ राखी’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी देवरी व चिचगड पोलीस स्टेशन आणि गणुटोला पोलीस कॅम्प येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामूहिकरित्या रक्षणाचे रेशीम बंधन बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
देशाच्या रक्षणार्थ सीमेवर संरक्षण दलातील जवान तर देशांतर्गत पोलिसांचे कार्य २४ तास सुरू असते. ते अहोरात्र आपले कर्तव्य बजावतात. त्यामुळेच सामान्य जनता सुरक्षित आहे. आपले कर्तव्य बजावताना जवान असो अथवा पोलीस यांना ही भावना असतात. त्यांचे कुटुंब ही असते पण ते कोणताही उत्सव असो किंवा सण असो ते नेहमी बंदोबस्तावर राहून आपले कर्तव्य बजावतात. कोरोना काळातही त्यांनी एक योद्धा म्हणून कार्य केले. बहीण भावाच्या ऋणानुबंध असलेला रक्षाबंधन हा सण आम्ही महिला, भगिनी, जनतेच्या संरक्षणार्थ असलेल्या पोलीस बांधवांसह साजरा करीत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या सीमा कोरोटे यांनी व्यक्त केले. देवरी येथील पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार रेवचंद सिंगनुडे, एपीआय आनंदराव घाडगे, पीएसआय नरेश उरकुडे, चिचगड पोलीस स्टेशन येथे ठाणेदार शरद पाटील, पीएसआय मनोहर इसकापे, गणुटोला येथील पोलीस कॅम्प येथे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, लक्ष्मण मोगले, गावळे यांच्यासह देवरी, चिचगड पोलीस स्टेशन व गणुटोला येथील सशस्त्र दूरक्षेत्र येथे कार्यरत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधली. महिला काँग्रेसच्या रिना बावनथडे, निर्मला मडावी, छाया मडावी, कविता मारवाडे, हनुवंता आचले, चंद्रकला भोयर, कला सरोटे, छाया टेंभुरकर, प्रभा बहेकार व उज्ज्वला कोचे उपस्थित होते.