गोंदिया : सडक अर्जुनी येथील नगर पंचायतची निवडणूक लवकरच होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये बोगस मतदारांचा भरणा केला जात असल्याचा प्रकार काहीच दिवसांपूर्वी उघडकीस आला होता, तर १८ वर्षांखालील मतदारांची नावे सुद्धा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. ही बाब पुढे आल्यानंतर तहसीलदारांनी बीएलओचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला कारणे दाखवा नोटीस बजाविले आहे. मात्र अर्ज पडताळणीचे जबाबदारी असणाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
सडक अर्जुनी येथील ग्रामपंचायत निवडणुकीला घेऊन सध्या राजकीय आखाडा चांगलाच रंगला आहे. निवडणुकीत विजयाचे समीकरण पूर्ण करण्यासाठी सडक अर्जुनी लगत असलेल्या पाच ते सहा गावांतील दीडशेहून अधिक मतदारांची नावे सडक अर्जुनीच्या मतदार यादीत नोंदविण्यात आली आहे. हा प्रकार पुढे आल्यानंतर दिनशे अग्रवाल यांच्यासह आठ जणांनी याची पुराव्यासह तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर मतदार याद्या तयार करण्याचे काम नव्याने सुरू करण्यात आले, तर याच दरम्यान सडक अर्जुनी येथील मतदार यादीत १८ वर्षांखालील तीन जणांची नावे नोंद करण्यात आली होती. हा प्रकार सुद्धा माजी नगरसेवकांनी पुढे आणून याची तहसीलदारांकडे तक्रार केली. त्यानंतर तहसील कार्यालयाने याचे खापर बीएलओचे काम करणाऱ्या अंगणवाडीसेविकेवर फोडले आहे. मात्र बीएलओने अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी अथवा शंकास्पद वाटणाऱ्या अर्जावर आक्षेप घेऊन त्यावर सुनावणी करण्याचे काम तहसील कार्यालयाचे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे आहे. मात्र त्यांना अभय देत बीएलओवर खापर फोडीत कारण दाखवा नाेटीस बजाविली. त्यामुळे या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सडक अर्जुनी येथील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असून, जिल्हाधिकऱ्यांनी याची दखल घेऊन यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.