गोंदिया : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून बळीराजा अनेक संकटांना तोंड देत आहे. मात्र, यामुळे खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. मृग नक्षत्राला सुरुवात होण्यापूर्वी खरिपातील पेरणीपूर्व कामे आटोपण्याचा प्रयत्न करीत आहे. यंदा खरीप हंगामात २ लाख २० हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक लागवडीसाठी २ लाख २० हजार २४० हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आला आहे. यापैकी १ लाख ८६ हजार ४३१ हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड केली जाणार आहे. उर्वरित क्षेत्रात तूर, तीळ, हळद, आले, मका, सोयाबीन, ऊस व भाजीपाला पिकांची लागवड केली जाणार आहे. लागवड क्षेत्रापैकी १ लाख ६ हजार ३२३ हेक्टर क्षेत्र खरीप सिंचनाखाली आहे. जिल्ह्यात सुमारे २ लाख ७२ हजार १७८ शेतकरी आहेत. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी ४८९६० क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. त्यापैकी २३३६७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. मागील खरीप हंगामात ५६९४३ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला होता. ९७७०४ मेट्रिक टन खताच्या मागणीपैकी ८१३२ मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. सद्यस्थितीत २३९८९ मेट्रिक टन खताचा साठा असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे.
.......
शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त
शेतकरी हंगामपूर्व शेत मशागतीच्याकामात व्यस्त आहे. बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्य खरेदीचे नियोजन बळीराजाने केले आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज उपलब्ध झाले नसल्याने त्यांना बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. भरघोस उत्पन्नाची अपेक्षा मनात बाळगून जगाचा पोशिंदा पूर्ण उमेदीने खरीप हंगामात पीक लागवडीसाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे.
...................
भरारी पथकांची राहणार नजर
कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. बियाणे, खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यापैकी २३३६७ क्विंटल बियाणे व ८१३२ मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. निर्धारित किमतीपेक्षा अधिक दराने कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. अधिक दराने बियाणे खते व अन्य कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्यांची तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी सांगितले.