फुटाना : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्यावतीने खावटी अनुदान योजना २०२०-२१ अंतर्गत एकलव्य बोरगाव बाजार येथे पात्र लाभार्थ्यांना खावटी किट वितरण आमदार सहसराम कोरोटे व आदिवासी विकास विभाग (नाशिक) संचालक भरतसिंग दुधनाग यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनमोल सागर तसेच बोरगाव आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र भाकरे यांच्या संयुक्तवतीने आयोजित कार्यक्रमाला सहायक प्रकल्प अधिकारी एच.ए. सरयाम, सरपंच कल्पना देशमुख, उपसरपंच काशिबाई कुंजाम, सदस्य कैलास देशमुख, कुलदीप गुप्ता, एकलव्य प्राचार्य संजय बोनतावार यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार कोरोटे यांनी, सन १९७८ मध्ये सुरू झालेली खावटी कर्ज योजना २०१३ पासून बंद करण्यात आली होती. लोकप्रतिनिधींनी शासनाकडे वारंवार मागणी लावून धरली व कोरोनाच्या भीषण संकटात महाआघाडी सरकारने त्याची दखल घेतली. ९ सप्टेंबर २०२० रोजी शासन निर्णय काढून खावटी अनुदान योजना २०२०-२१ मंजूर केल्याचे सांगीतले. तसेच बोरगाव येथे दोन्ही शाळा मिळून १००० विद्यार्थी व २००० लोकसंख्या असताना आरोग्य सेवा नसल्याचे मुख्याध्यापक भाकरे यांनी सांगितल्यावर लगेच सरपंचांना ठराव घेऊन प्रस्ताव तयार करून पाठवा, असे सांगत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दूधनाग यांनी, खावटी किटऐवजी संपूर्ण चार हजार रुपये बँकेत जमा करण्याविषयी आपले मत मांडले. याप्रसंगी १२ लाभार्थ्यांना खावटी किटचे वितरण करण्यात आले. संचालन बारसागडे यांनी केले. आभार सरयाम यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहायक प्रकल्प अधिकारी सरयाम व शिवाजी तोरकड यांनी सहकार्य केले.