गोंदिया : राज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा करून विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीवर ठेवणाऱ्या ठाकरे सरकारचा अकरावी प्रवेशाच्या घोळात आता शिष्यवृत्ती परीक्षेतील गोंधळाची भर घातली आहे. शिक्षण खाते काँग्रेसकडे आहे म्हणून गंमत पाहत स्वस्थ न बसता आता मुख्यमंत्र्यांनी हा सावळा गोंधळ निस्तरला पाहिजे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष केशव मानकर यांनी केली आहे.
१७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार, असा जीआर निघाला होता. त्याला स्थगिती दिल्यावरून या सरकारची धरसोड वृत्ती पुन्हा दिसली आहे. राज्याच्या शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे हित खुंटीवर टांगले असून सातत्याने शिक्षणसम्राटांच्या हिताचीच भूमिका घेतली आहे. शाळा सुरू करण्यापासून परीक्षांपर्यंत आणि प्रवेशापासून शिकवण्यांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर न्यायालयाने चपराक लगावल्याखेरीज शिक्षण खात्याचा गाडा पुढे सरकतच नाही. दहावी-बारावी परीक्षांचा घोळ सरकारच्या धोरण लकव्यामुळेच वाढला असून आता प्रवेश प्रक्रियेवर चाचपडणे सुरू झाल्याने अकरावीच्या शैक्षणिक वर्षाचीही वाताहत होण्याची भीती आहे. शिक्षण खात्याच्या कारभाराचे सातत्याने वाभाडे निघत असल्याने राज्याच्या शिक्षणक्षेत्राचा प्रवास उलट्या दिशेने सुरू झाला असून, विद्यार्थी-पालक, हवालदिल आणि सरकार दिशाहीन, असे चित्र निर्माण झाले आहे. शिक्षण संस्थाचालकांच्या हितासाठी तत्परतेने हालचाली करणारे सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे साफ दुर्लक्ष करत असून, अकरावी प्रवेशातील दिरंगाईतून हे स्पष्ट झाले आहे. कोणाच्या तरी फायद्यासाठी सीईटी घेण्याच्या हेतूला न्यायालयाने लगाम घातल्याने प्रवेश प्रक्रिया लांबवून त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना देऊ नये, असे मानकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.