ओ.बी. डोंगरवार ल्ल शासनाकडून शाळेत किंवा अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना खिचडी दिली जाते. याची संपूर्ण जबाबदारी शाळेत कार्यरत मुख्याध्यापक किंवा अंगणवाडी सेविकेकडे दिली आहे. मात्र खिचडीमध्ये अनेक प्रकार समोर आल्याने शेवटी गावातील बचतगटाला खिचडी वाटपाचे काम देण्यात आले. मात्र या खिचडी वाटपातही बचत गटाकडून ‘खिचडी’ सुरू असल्याने याची संपूर्ण चौकशी होणे तेवढेच गरजेचे झाले आहे.शाळेला विद्यार्थी संख्येनुसार धान्य पुरवठा केला जातो. यावर शाळेतून महिन्याचा गोषवारा काढून केंद्र प्रमुखाकडे दिला जातो. वास्तविक शाळेला दिलेल्या धान्याचा संपूर्ण तपशील काढला तर खिचडीमध्ये कशी ‘खिचडी’ शिजते हे दिसून येते. केंद्र प्रमुख गोषवारा प्रत्यक्षात तपासून बघत नाही. याला कारण खिचडीच्या अहवालात केंद्रप्रमुख आपलीही पोळी भाजून घेतात. समजा एखाद्या केंद्रप्रमुखाकडे पाच शाळा तपासणीसाठी दिल्या तर महिन्याची केंद्रप्रमुखाची खिचडी चांगली शिजते. शाळेला दिलेला धान्य पुरवठा महिन्याकाठी शिल्लक राहतो. तेथे शाळेतील मुख्याध्यापक आपली खिचडी पकवितात. मध्यंतरीच्या काळात खिचडी वाटपाचे काम मुख्याध्यापकाकडे दिले होते. तेथे दोन गट तयार झाले. काही शिक्षक मुख्याध्यापकाच्या विरोधात कुरकुरत होते. त्यामुळे शाळेत वातावरण चांगले खेळीमेळीचे असावे याकरिता गावातील महिला बचत गटांना खिचडी वाटपाचे काम देण्यात आले. शाळेतील खिचडी वाटपाचा संपूर्ण तपशील केंद्रप्रमुखाकडे असतो. अंगणवाडीतील खिचडी तपासणीचे काम एकात्मिक बालविकास प्रकल्पात कार्यरत अधिकारी किंवा अधिनस्त कर्मचारी करतात. मात्र ठिकठिकाणच्या अंगणवाडीतील विद्यार्थी संख्या बघता बचतगट व अधिकारी यांच्या साठगाठमुळे त्यांच्याचही चांगली खिचडी शिजते. गावातील काही विद्यार्थी इतर ठिकाणी शिक्षण घेतात. त्यांचे नाव अंगणवाडीत दाखवून खिचडीचा पैसा उचल केला जातो. अंगणवाडीतील सेविका किंवा चपराशी जे विद्यार्थी बाहेर शिकतात त्यांच्या घरी जाऊन आहाराच्या विद्यार्थी यादीवर पालकांच्या सह्या घेऊन खिचडी शिजविण्याचा प्रयत्न करतात. तालुक्यातील एका गावातील विद्यार्थी इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये आहे. मात्र त्याच विद्यार्थ्याचे नाव अंगणवाडीतील हजेरीपटावर दाखवून खिचडी वाटप केल्या गेल्याची नोंद होत आहे. यावर सुज्ञ पालकांनी माझा मुलगा दुसऱ्या शाळेत शिकत आहे, मग त्याचे नाव अंगणवाडीत कसे दाखविले जात आहे, अशी विचारणा करताच ‘खिचडीत खिचडी’ शिजते, असे सांगून पालकांची सांत्वना केली जात आहे.ही स्थिती प्रत्येक गावातील शाळा व अंगणवाडीत दिसत आहे. यात खिचडी तयार करणारा बचतगट, कार्यरत मुख्याध्यापक किंवा अंगणवाडीतील सेविका तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्पातील सुपरवायझर, केंद्रप्रमुख अशी साखळी आपली खिचडी शिजवून घेत आहेत. एकंदरित या खिचडीच्या आहाराची कसून तपासणी केली तर यात मोठी साखळी काम करीत असल्याचे दिसून येईल. शाळा किंवा अंगणवाडीला जो आहार पुरविला जातो, त्याची महिन्याच्या शेवटी इतरत्र वाट लावली जाते. तिथे पण खिचडीच्या आहारात गैरप्रकार करण्याचा प्रकार खुलेआम सुरु आहे. गोरगरिबांची मुले कुपोषित राहू नये, सर्वांना जीवनसत्व मिळावे, बुद्धीचा विकास व्हावा, ज्ञानात भर पडावी, विद्यार्थी हूशार व्हावे, शरीर सुदृढ व मजबूत व्हावे व बुध्यांक वाढावा असा दूरदृष्टीकोन समोर ठेवून शासनाने शाळा व अंगणवाडीत खिचडी सुरू केली. मात्र दूरदृष्टिकोनाचा उद्देश बाजुला राहून संबंधित योजना राबविणारे अधिकारी किंवा कर्मचारी यांना तसेच बचतगटांना सुगीचे दिवस आले. अशाप्रकारे खिचडीच्या वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ तसेच अनियमितता आहे. असे असताना सर्वकाही बरोबर आहे असे प्रशासनातील अधिकारी दाखवितात. बचतगटांना खिचडी शिजविण्याकरिता त्यांना योग्य मोबदला दिला जातो. मात्र त्यापेक्षा दोन पाऊल पुढे जाऊन बचतगट खिचडीत खिचडी करुन आपले चांगभलं करण्याची भूमिका घेत आहेत. यात बहुतांश महिला बचतगटांची भूमिका संशयास्पद नाही. काही गावात खूप पारदर्शकता आहे हे नाकारता येणार नाही. मात्र एका बचत गटामुळे इतर ठिकाणी खिचडीत खिचडी चांगल्या प्रकारे शिजविली जाते. यामुळे बोगस नावे दाखवून शासनाच्या सकस आहार योजनेला पूर्णपणे हडपण्याचा हा प्रकार सुरू आहे. याकरिता वाटप यंत्रणा बदलविणे गरजेचे आहे. तपासणी अधिकारी बदलविणे गरजेचे आहे. तेव्हाच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खिचडी मिळेल व खिचडीच्या नावावर शिजतअसलेली दुसरीच खिचडी शिजविणे थांबेल.
बचत गटातील खिचडी वाटपात ‘खिचडी’
By admin | Published: February 13, 2016 1:16 AM