काचेवानी : गोंदिया-भंडारा जिल्ह्याशी प्रत्येक ठिकाणी व विभागात पक्षपात केला जातो. हा कदाचित विदर्भाला मागासलेले समजण्यात येत असण्याचाच प्रकार आहे. अशीच बाब रा.प. परिवहन महामंडळ विभागात अनेक वर्षांपासून पहायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यात व खास म्हणजे तिरोडा आगारात राज्यातील प्रमुख ठिकाणी वापरण्यात आलेल्या खटारा बसेस पाठविण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठीच गैरसोय होत आहे. या बसेस कधीही व कुठेही बंद पडतात.ग्रामपंचायत निवडणुकीच्या एका दिवसापूर्वी तिरोडा-कोडेलोहारा-करडी ही १२ ते एक वाजताची तिरोडा आगाराची बस (एमएच ४०/एन-८५८९) नांदलपार ते लोणारा गावांच्या मध्यभागी बिघडली. ती दुरूस्त करण्याकरिता आगार व्यवस्थापकांनी (एमएच १४/बीटी-०८१२) बसवर दोन यांत्रिकांना पाठविले. मात्र दोन तास प्रयत्न करूनही त्या बसमध्ये सुधार झाला नाही. दरम्यान शनिवारी ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने मतदान केंद्र अधिकाऱ्यांना सोडण्याकरिता (एमएच ४०/८९४७) बस सोडण्यात आली. रस्ता अरूंद असल्यामुळे पूर्वीच्या दोन बसेस लटकल्या होत्या. निवडणूक पार्टी घेवून जाणारी तिसरी बससुद्धा लटकली. त्यामुळे त्यांना तीन ते पाच वाजतापर्यंत तिथेच ठान मांडून रहावे लागले. या बिघडलेल्या बसमध्ये १२ ते ५.३० वाजतापर्यंत प्रवाशांची मोठीच बिकट अवस्था झाली होती. प्रवाशांजवळ लहान मुलेसुद्धा होते. सर्व प्रयत्न झाल्यानंतर शेवटी १० ते १२ प्रवाशांनी बिघडलेल्या बसला २०० ते ३०० मीटरपर्यंत ढकलत नेले व गाडी निघेल अशी जागा तयार करण्यात आली. तेव्हा सायंकाळी ५ ते ५.३० वाजेदरम्यान गाड्या सोडण्यात आल्या. निवडणूक अधिकारी सहा वाजता आपल्या गंतव्य स्थळी पोहोचले. दरम्यान त्यांना मोठाच त्रास सहन करावा लागला. तिरोडा आगाराला नेहमीच खटारा बसेस पाठविण्यात आल्या. राज्यभरातील विविध आगारात वापरलेल्या बसेस या आगारात पाठविल्या जातात. त्या कधी व कुठे बंद पडतील व प्रवाशांची गैरसोय होईल, हे सांगता येत नाही. (वार्ताहर)
तिरोडा आगारात पाठविल्या जातात खटारा बसेस
By admin | Published: August 01, 2015 2:15 AM