वडिलोपार्जित शेतीचा वाद : गुढरी गावाच्या शेतशिवारातील थरार बोंडगावदेवी : वडिलोपार्जित असलेल्या बोअरवेलच्या पाणी वाटपावरुन तसेच शेतीच्या हिस्से वाटणीच्या भांडणातून झालेल्या मारहाणीत शेतशिवारात दिवसाढवळ्या मोठ्या भावाने लहान भावाची गळा आवळून हत्या केली. ही घटना शनिवारी (दि.४) दुपारी गुढरी येथील शेतविवारात घडली. गणेश तुकाराम रुखमोडे (३८) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गुढरी येथे मृतक गणेश रुखमोडे हा आई, पत्नी व १२ वर्षाच्या अपंग असलेल्या एका मुलासोबत वेगळा राहतो. शनिवारी सकाळी ६ वाजता शेतामधील पिकांना पाणी देण्यासाठी गणेश गेला होता. बराच वेळ निघून गेला तरी पती घराकडे आला नाही म्हणून त्याच्या पत्नीने सासू निर्मलाबाईला शेतामध्ये पाठविले. मुलगा शेतामध्ये दिसत नाही म्हणून म्हातारी आई घरी परत आली. बराच वेळ होवून सुद्धा पती घरी आले नाही म्हणून मृतकाची पत्नी शारदाही शेतात गेली. शेतशिवारात सर्वत्र शोधूनही पतीचा थांगपत्ता लागला नाही. पती कुठेच दिसत नाही म्हणून शारदा घाबरून घरी आली. शेतात जातो असे सांगून सकाळी ६ वाजतापासून घराबाहेर पडलेला पती दिसत नाही म्हणून शारदाची चिंता वाढली. अखेर तिने घराशेजारील सागर सोरते, शिशुपाल शोरते या दोन मुलांना परत शेतामध्ये पाठविले. त्या दोन मुलांनी शेतात जावून सर्व शेतशिवार पिंजून मृतक गणेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेतात लागून झाडी-झुडूपे व नाल्यात पाणी जाण्यासाठी खोदलेली नाली त्या मुलांनी पाहिली असता त्या नालीमध्ये गणेश मृतावस्थेत नालीत पडून असल्याचे दिसून आले. ही वार्ता गावभर पसरली. त्यानंतर संपूर्ण गावच शेताकडे धावून आले. सदर घटनेची माहिती गुढरीचे पोलीस पाटील बाबुराव कोरे यांनी ११ वाजता भ्रमणध्वनीद्वारे अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच ठाणेदार नामदेव बंडगर, पोलीस उपनिरीक्षक कमलसिंह सूर्यवंशी, सहा. फौजदार माणिक खरकाटे, बीट अमलदार भोयर, बुराडे, अन्य सहकार्यासह पोलीस ताफा घटनास्थळी आला. त्यांनी घटनास्थळाची इत्यंभूत पाहणी केली. पंचासमक्ष मृतदेहाचा पंचनामा केला. मृतक गणेशच्या खुनाचे धागेदोरे, मृतकाच्या गळ्याभोवती असलेले व्रण, नालीमध्ये ठेवलेला मृतदेह या सर्व गोष्टींचा बारकाईने शोध घेतला. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळाला देवरीची उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनीही भेट देवून मृतकाच्या पत्नीला सर्व हकीकत विचारली. तिने दिलेल्या माहितीवरुन खुन्यापर्यंत पोहोचण्यास पोलिसांनी सोयीस्कर झाल्याचे समजते. दिवसाढवळ्या शेतशिवारात झालेल्या खुनाने गुढरीसह परिसरातील वातावरण ढवळून निघाले आहे. मृतक गणेशला गोवर्धन व जनार्धन हे दोन भाऊ आहेत. तिघा भावांना १६ एकर जमिनीमधून हिस्से वाटणी करण्यात आली. म्हातारी असलेली आई मृतकाकडे राहत होती. तिच्या पालनपोषणासाठी ३ एकर जमीन मृतकाला देण्यात आली होती. वडील हयात असताना शेतामध्ये बोअर खोदण्यात आला. ज्या बांधीमध्ये बोअर आहे ती जागा दुसऱ्या नंबरचा भाऊ जनार्धनच्या वाट्याला आली. त्या बोअरवर तिघाही भावाचा अधिकार होता. पण पाणी वाटपावरून त्यांच्यात वाद सुरू होता. (वार्ताहर) दोन भावांनी केले संगनमत मृतकाची पत्नी शारदा गणेश रुखमोडे (३४) हिने पोलिसांना दिलेल्या माहितीत माझ्या पतीला त्याच्या दोन भावांनीच संगनमत करुन शेतीच्या हिस्से वाटणीवरुन मारुन टाकले, असा आरोप केला आहे. जमिनीच्या हिस्ते वाटणीवरुन अनेकदा आईला जिवानिशी मारण्याची धमकी देत होते अशीही माहिती पोलिसांना देण्यात आली. दोघाही भावांनी संगनमत करुन पतीला जिवानिशी मारले असा आरोप शारदा हिने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये केला आहे. सख्खा भाऊच निघाला मारेकरी मृतक गणेशचा मारेकरी दोन नंबरचा भाऊ जनार्धन तुकाराम रुखमोडे (४२) हाच निघाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले. सख्खे भाऊ पक्के वैरी झाल्याच्या या घटनेने गुढरी गावात दहशत पसरली आहे. लहान भावाचा खून केल्याच्या आरोपावरुन मोठा भाऊ जनार्धन तुकाराम रुखमोडे याच्या विरोधात कलम ३०२ (खून), २०१ खून करुन प्रेत लपविणे, भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात येवून आरोपीस ताबडतोब ताब्यात घेवून अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, ठाणेदार नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलसिंह सूर्यवंशी, माणिक खरकाटे, बुराडे पुढील तपास करीत आहे.
शेती व पाण्यासाठी लहान भावाची हत्या
By admin | Published: February 05, 2017 12:04 AM