बोंडगावदेवी : माॅं जिजाऊंच्या सुसंस्कारात वाढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेचे हित साधले. आपल्या राज्यकारभारात सर्वधर्मांच्या प्रतिनिधींना नियुक्त करून सामाजिक सलोखा कायम ठेवला. शत्रूंच्या महिलांचासुद्धा त्यांनी आदर केला. त्यांच्या कारभारात महिलांचा विशेष मानसन्मान केला जात होता. त्यांच्या राजदरबारात नृत्यांगना कदापि दिसल्या नाहीत. ते समाजातील प्रत्येक महिलेला मातेसमान वागणूक देऊन आदरातिथ्य करणारे जाणते राजे होते, असे प्रतिपादन नवनर्वाचित सरपंच प्रतिमा बोरकर यांनी केले.
येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सभारंभात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच भाग्यवान फुल्लुके, सदस्य उषा पुस्तोळे, माया मेश्राम, निराशा मेश्राम, डॉ. श्यामकांत नेवारे, ॲड. श्रीकांत वनपूरकर, अमरचंद ठवरे उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रमाता माॅं जिजाऊ व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राचे विधिवत पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमरचंद ठवरे यांनी केले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कर्मचारी राष्ट्रपाल ठवरे, भोजराज मेश्राम, विश्वास लोणारे, संगणक परिचालक मनोज पालीवाल यांनी सहकार्य केले. यावेळी नागरिक उपस्थित होते.