जिल्हाधिकारी सूर्यवंशी : अधिकाऱ्यांना माहिती अधिकार प्रशिक्षण गोंदिया : कार्यालयीन कामकाजात परदर्शिता यावी, यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम पारित करण्यात आले. याद्वारे सामान्य नागरिक कामकाजाची संपूर्ण माहिती मागू शकते. करिता कार्यालयीन कामकाजासाठी माहितीच्या अधिकाराचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्तवतीने तलाठी तथा सहायक जनमाहिती अधिकारी यांच्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित दोन दिवसीय माहिती अधिकार प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. सर्वसामान्य नागरिकांना माहितीचा अधिकार अभिनियम २००५ अंतर्गत कार्यालयीन माहिती प्राप्त करता येते. ही माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देतेवेळी संबंधित अधिकाऱ्यांना अडचणी येऊन नये व योग्य ती माहिती देता यावी याकरीता या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी एन.के. लोणकर, अधीक्षक जी.डी. किरीमकर, प्रशिक्षणाच्या संयोजिका आशा तागडे, प्रकल्प अधिकारी सतीश पाटील, मार्गदर्शक अॅड. भूषण हिरोळे, प्रदिप देशमुख व यशदाचे समन्वयक नितीन राऊत उपस्थित होते.अॅड. हिरोळे व देशमुख यांनी, जास्तीत जास्त माहिती खुली व अद्ययावत होण्याच्या दृष्टिने माहितीच्या अधिकाराची भूमिका यावर विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. माहितीचा अधिकार कायद्याचा इतिहास, स्वरुप, समुचित शासन व प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्या, स्वयंप्रेरणेने प्रकटन करावयाची माहिती, जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी यांची कर्तव्य, जबाबदाऱ्या, पत्रव्यवहार, नमुने व निकाल पत्र या विषयांवर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक सतीश पाटील यांनी मांडले. प्रशिक्षणार्थ्यांना माहिती अधिकाराची मार्गदर्शन पुस्तिका देण्यात आली. प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने तलाठी, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
अधिकाराचे ज्ञान असणे आवश्यक
By admin | Published: October 09, 2015 2:11 AM