नरेश रहिले।आॅनलाईन लोकमतगोंदिया : महाराष्ट्र व छत्तीसगडच्या अगदी सीमेवर असलेले गाव म्हणजे कोपालगड. गोंदिया मुख्यालयापासून ६५ किमी दूर, चारही बाजूला घनदाट जंगल, या गावापासून छत्तीसगडचे अंतर फक्त २ कि.मी आहे. गाव शंभर टक्के आदिवासी, बोलीभाषा छत्तीसगडी, संवेदनशील क्षेत्र, गावाला जाण्यासाठी रस्ते नाही. निर्जन वस्ती, गावात आधुनिक असे काहीच नाही. लोक कमी शिकलेले व अंधश्रद्धाळू अशा परिस्थीतीतील विद्यार्थ्यांना शहरातील दर्जेदार खासगी शाळांसारखे शिक्षण देण्याचे काम धनराज जमकाटन व सुरेश चव्हाण या दोन ध्येयवेड्या शिक्षकांनी केले आहे.कोपालगड हे गाव गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या या शाळेचीे पटसंख्या १६ आहे. ही शाळा गणित व भाषा मुलभूत क्षमतेत शंभर टक्के प्रगत आहे. तसेच सामान्य ज्ञानाच्या माहितीत विद्यार्थी पटाईत आहेत. जिल्हा परिषद शाळा कोपालगड या शाळेत ६ संगणक संच आहेत. १ प्रोजेक्टर आहे. येथील सर्व विद्यार्थी कुशलतेने संगणक हाताळतात. वर्ग ज्ञानरचनावादी, वर्गात इंग्रजीत एखाद्या विषयावर लेखन केलेले आढळते. गणित व भाषा साहित्य पेटीचा वापर करण्यात विद्यार्थी मग्न असतात. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्व विभाग व विभागवार जिल्ह्यांची माहिती तोंडपाठ आहे. या शाळेला जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्था येथील विषय सहाय्यक मुकेश रहांगडाले यांनी भेट दिली.या भेटीत इयत्ता पहिलीच्या नितेश सोमु पराते या विद्यार्थ्याने महाराष्ट्रातील सर्व विभाग व विभागातील सर्व जिल्ह्यांची नावे सांगितले. पहिल्या वर्गातीलच विद्यार्थिनी दिव्यांशी शंकर पडोती हिने भारतातील सर्व राज्याच्या राजधानी तोंडपाठ सांगितल्या. इयत्ता पहिली व दुसरीच्या सर्वच विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, हजार पर्यंत संख्या वाचन, भाषेत श्रृतलेखन, वाचन करतात.वर्ग ३-४ चे विद्यार्थी गणिती सर्व क्रीया, शाब्दिक उदाहरणे, मराठीत वाचन सहज करतात. सामान्य ज्ञान तर सर्वच विद्यार्थ्यांचे आश्चर्यचकित करणारे आहे. दुसरी ते चौथीचे विद्यार्थी एखादा विषयावर चार पाच वाक्य सहज बोलतात. काहींना वाटेल यात काय ऐव्हढं, परंतु या गावाची विदारक स्थिती पाहता येथील सर्वच विद्यार्थी गुणवंत घडावेत ही गोष्ट साधी नाही.भयमुक्त वातावरणासाठी डबा पार्टीप्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची अंमलबजावणी करताना आता विद्यार्थ्यांना आनंददायी पध्दतीने शिक्षण देणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात शिक्षण घ्यावे, विद्यार्थ्यांशी मैत्री करून त्यांना शिकवण देण्याचे काम सुरेश चव्हाण व धनराज जमकाटन यांनी केले आहे. हे दोन्ही शिक्षक आठवड्यातून दोनवेळा आपल्या पैशाने सर्व मुलांसाठी खाऊ नेतात. विद्यार्थ्यांसोबत डबा पार्टीचा आनंद घेतात.२० दिवसात १५० भेटीप्रगत शैक्षणिक महाराष्ट्रची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी तसेच गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी गुणवंत व्हावा. यासाठी जास्तीत जास्त शाळांना भेटी देण्याचे काम जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्था, गोंदियाचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्याकडून सुरू आहे. हिवारे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मागील २० दिवसात १५० शाळांंना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे कसे विशेष लक्ष देता येतील याबाबत टिप्स शिक्षकांना दिल्या.मुलांना शिकविण्यात, त्यांना प्रगत करण्यात जात, गरिबी, बोलीभाषा, प्रदेश अशी कोणतीच बाब आड येऊ शकत नाही. प्रत्येक मुलांचा विकास करण्याचा ध्येय शिक्षकांनी बाळगला तर सहजरित्या गुणवंत विद्यार्थी घडू शकतात.- मुकेशकुमार रहांगडाले, विषय सहाय्यकजिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्था, गोंदिया.
ध्येयवेड्या शिक्षकांची गुणवंत शाळा कोपालगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:27 PM
महाराष्ट्र व छत्तीसगडच्या अगदी सीमेवर असलेले गाव म्हणजे कोपालगड. गोंदिया मुख्यालयापासून ६५ किमी दूर, चारही बाजूला घनदाट जंगल, या गावापासून छत्तीसगडचे अंतर फक्त २ कि.मी आहे.
ठळक मुद्देसामान्य ज्ञानात पडली भर : प्रत्येक विद्यार्थी कुशलतेने हाताळतो संगणक