आमगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत आसोलीअंतर्गत असून कोसमटोला, चिंताटोलावरून गोरेगाव तालुक्यातील कालीमाटी या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची मागील पाच वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. यामुळे या मार्गावरुन ये-जा करताना वाहन चालक व गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही.
कालीमाटी गावात मॅग्नेट फॅक्टरी असल्यामुळे अवजड ट्रक आणि ट्रॅक्टरची सातत्याने वाहतूक सुरू असते. अनेकदा गावकऱ्यांकडून याची तक्रारसुद्धा संबंधित विभागाकडे करण्यात आली. पण, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळ्याला सुरुवात झाली असून, रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता बळावली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याची दखल घेऊन रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
नरेश बोपचे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.