गोंदिया : दरवर्षी उन्हाळ्यात खेळाडूंच्या कौशल्य वाढीसाठी शासकीय व संघटना स्तरावर क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन परीक्षेचा हंगाम संपताच सुरू होते. यामुळे खेळाडूंचे कौशल्य व कामगिरीतही सुधारणा होते. परंतु गतवर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या शिबिरांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे खेळाडूंच्या कौशल्य वाढीच्या चेनला ब्रेक लागला आहे.
वार्षिक परीक्षेनंतर जिल्हा क्रीडा कार्यालय, विविध क्रीडा संघटना, विविध क्लब आणि ॲकॅडमीच्या माध्यमातून दीर्घकालीन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते. या शिबिरांतर्गत ३० ते ४० दिवसांचे प्रशिक्षण होत असते. यातून खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेच्या वाढीसह त्या-त्या खेळाच्या कौशल्य वाढीसाठी प्रयत्न केला जातो. या प्रशिक्षण शिबिरातून अनेक खेळाडू आपली कामगिरी उंचावत असतात. वर्षभर खेळण्यायोग्य शारीरिक क्षमता व कौशल्य विकास यातूनच उदयास येत असतो. त्यामुळे अशा प्रशिक्षण शिबिरांची बांधणी अनेक खेळांतूृन होत असते. कोविड १९ मुळे मागीलवर्षी सुध्दा या कालखंडात लाॅकडाऊन होते. त्यामुळे ही शिबिरे झाली नाहीत. कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी होत असतानाच राज्यात पुन्हा संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे यंदाही नवोदित खेळाडू या शिबिराला मुकणार आहेत. परिणामी खेळाडूंच्या कौशल्य विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. वर्षभर अभ्यास करावा लागत असल्याने खेळाडूंचा दोन सत्रात नियमित सराव होत नाही. उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामुळे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात खेळाडू अधिकाधिक वेळ देऊ शकतात. त्यामुळे अशा शिबिरांना महत्त्व आहे. जिल्ह्यात विविध खेळाच्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे. त्यात प्रामुख्याने ॲथलेटिक्स्, नेटबॉल, डॉजबाॅल, बास्केटबॉल, सेपक टकराव, रग्बी, जुदो, कुस्ती, खो-खो, कबड्डी यासह अनेक खेळांचा समावेश आहे. मात्र यंदाच्या वर्षातही उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला खेळाडूंना मुकावे लागणार असल्याने खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व पालकांतून याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
.............
कोरोनामुळे सरावासाठी अडचण
संचारबंदीमुळे सध्या घरच्या घरीच व्यायाम सुरू आहे. दरवर्षी उन्हाळ्यात प्रशिक्षण शिबिो होतात. मात्र यंदाच्या वर्षात मैदाने बंद असल्याने अडचण झाली आहे. कौशल्य विकास, आत्मविश्वास वाढीसाठी हे शिबिर उपयुक्त ठरत आहे. मात्र कोविडमुळे यावर पाणी फेरले असल्याचे राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू ऋतुराज यादव यांनी सांगितले.
..........
क्रीडा विकासाची गती मंद होणार
क्रीडा क्षेत्रासाठी खेळाडू हा केंद्रबिंदू असतो. खेळाडूंच्या कामगिरीवरच स्पर्धेचा विजेता ठरतो. त्यामुळे खेळाडूंच्या कौशल्याला महत्त्व आहे. कौशल्य वाढीसाठी हे शिबिर महत्त्वाचे असून हे शिबिर होत नसल्याने क्रीडा विकासाची गती मंद झाल्याचे पवन पटले यांनी सांगितले.
.....
खेळ व व्यायाम शारीरिक तंदुरुस्तीचे औषधी काम
खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक विकासासोबतच खेळाचे कौशल्य विकसित होऊन खेळाडू जिल्ह्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करू शकतो. त्यासाठी हे शिबिर महत्त्वाचे असून शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ व व्यायाम औषधी काम करत असल्याचे युवा एकता क्रीडा संस्था सचिव भोजराज रहांगडाले यांनी सांगितले.
.......