गोंदिया : कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबाद्वारे क्षुल्लक कारणांना घेऊन आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या आरोग्य कर्मचारी तसेच डॉक्टरांशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केल्याचा अनेक घटना जिल्ह्यात सतत घडत आहेत. याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरोग्य विभागाला वादापासून वाचविण्यासाठी पोलीस सुरक्षेची मागणी करण्यात आली होती. यावर जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल उचलून जिल्ह्यातील सर्व कोविड केंद्र व आरोग्य विभागात पोलीस तैनात करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णसंख्या अधिक असल्याने रुग्णालयात वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्याने त्या रुग्णांवर वेळेवर योग्य ते उपचार करण्यास वेळ लागत आहे. या ठिकाणी कर्तव्यावर असलेले आरोग्य कर्मचारी व डॉक्टर २४ तास निरंतर सेवा देण्यात व्यस्त आहेत. त्यातच एखाद्या रुग्णाला वेळेवर भरती करणे व त्यांच्यावर उपचार करण्यास विलंब होत असताना रुग्णाचे कुटुंबीय डॉक्टरासोबत हुज्जत घालण्यास मागे पुढे पाहत नाही एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी ते डॉक्टरांना मारहाण करण्यास ही घाबरत नाही. अशा प्रकारच्या अनेक घटना मागील आठवड्यापासून तिरोडा, रामनगर, सडक-अर्जुनी व देवरी येथील कोविड रुग्णालयात घडल्या आहेत. यामुळे आरोग्य कर्मचारी व डॉक्टरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याकडे लक्ष वेधून जिल्हा प्रशासनाने वादावर नियंत्रण तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र व कोविड रुग्णालयात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.