लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर प्रभावीपणे करीत राहणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लसीकरणाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावी कामगिरी बजावेल. कोरोना लस ही सुरक्षित असून कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे अधिनस्त क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूर यांच्या उपक्रमांतर्गत कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचा तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. निवासी जिल्हा अधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. सुशांकी कापसे, केटीएसच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात १६ व्हॅन्सव्दारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड लसीकरण मोहीम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये १० दिवस व्हॅन्सव्दारे फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
लसीकरणाची माहिती पोहचविण्याचा प्रयत्न या उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविडविषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहचविणे हा या मागील उद्देश आहे. लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे.
कलापथकातून जनजागृती कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे. कलापथकाचे अवधूत पवार व त्यांच्या चमूचे सदस्य परिश्रम घेत आहेत.