समस्या सोडविण्यासाठी उपोषण : रूग्ण व नातेवाईकांना सहन करावा लागतो त्रास गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालयात अनेक समस्या असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. या समस्या सोडविण्यासाठी १४ आॅगस्टपासून हनुमान चौक सिव्हील लाईन्स येथील वसंत सर्वजीत ठाकूर आपल्या सहकाऱ्यांसह केटीएस रूग्णालयासमोर उपोषणावर बसले आहेत. मात्र अद्याप दखल घेण्यात आली नाही. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व गंगाबाई रूग्णालयात मोठीच अव्यवस्था असून रूग्ण व रूग्णांच्या नातलगांना मोठाच त्रास होत आहे. केटीएस रूग्णालयातील डॉक्टर मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे प्रसंगी रूग्णांना जीवाशी मुकावे लागण्याची पाळी उद्भवते. त्यामुळे अशा डॉक्टरांचे घरभाडे बंद करण्यात यावे. प्रत्येक विभागाचे डॉक्टर्स आॅन कॉल राहत नाही. शिवाय दोन्ही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पर्याप्त सुविधा नाही. त्यामुळे रूग्णांसह नातलगांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते. दोन्ही रूग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण असते. स्वच्छतेच्या अभावामुळे रूग्ण बरा होण्यापेक्षा आणखीच आजारी होण्याची शक्यता असते. गेल्या काही दिवसांपासून तर रुग्णालयाच्या बाहेरील भागात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. मात्र नगर परिषद किंवा रुग्णालय प्रशासन त्यावर काहीही करण्यास तयार नाही. या समस्या त्वरित सोडविण्यात याव्या अन्यथा आंदोलन सुरूच राहील, असा इशारा वसंत ठाकूर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी) केटीएस रूग्णालयाच्या समस्या सीटी स्कॅन व सोनोग्राफी २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीत रहावे. अहवालासह एक्स-रेसुद्धा देण्यात यावे. ओपीडीमध्ये प्रत्येक विभागाचे वेगवेगळे डॉक्टर असावे. स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. नक्षल प्रभावित जिल्हा असल्याने एम्बुलंस दर दोन हजार ३०० रूपये करण्यात यावे. फ्री रेफर सर्व्हिस गरिबांसाठी लागू करावे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांना काम द्यावे. प्रत्येक आजाराची औषधी रूग्णालयात उपलब्ध व्हावी. मेडिकल कॉलेजचे डीन, जिल्हा शल्यचिकित्सक व निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यापैकी कुणीही एक २४ तास आपातकालीन स्थितीसाठी उपस्थित रहावे. ओपीडीमध्ये बीपी तपासणी करण्याच्या मशिनची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी.
केटीएस व गंगाबाई रूग्णालय झाले समस्यांचे माहेरघर
By admin | Published: August 20, 2016 12:52 AM