नंदू परसावार ल्ल भंडाराथंडीची चाहुल लागायला सुरूवात झाली. काही दिवसांनी बेडच्या आत, कपाटात कोंबलेले स्वेटर, शाल डोकवायला लागतील. त्यात जुन्या फॅशनचे जॅकेट, मफलर, कानटोप्या आकसलेले पण थंडीपासून वाचविणारी स्वेटर निघतील आणि कदाचित यावर्षी नवीन ट्रेंडप्रमाणे नवीन खरेदीही होईल. पण, तुमच्या जुन्या स्वेटरचे काय? फेकून द्यायचा विचार असेल तर यावर्षी एक गोष्ट नक्की करा. आपले जुने स्वेटर स्वच्छ धुवून आपल्या कार किंवा बाईकच्या डिक्कीत ठेवा. आॅफिस, कॉलेज किंवा बाहेर जाताना रस्त्यावर थंडीने कुडकुडणारे चिमुकले दिसले तर त्यांना हे जुने स्वेटर, शाल, मफलर, ब्लँकेट देऊन आपल्या वाट्याची माणुसकीची उब देऊन बघा! तुमची थंडी त्या निरागसांचे हसरे चेहरे बघून दूर पळेल.भंडारा जिल्ह्यात बालकामगांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. हे बालकामगार पोटासाठी दैनंदिनीप्रमाणे बोचऱ्या थंडीतही कुडकुडत काम करीत असतात. ही मुले कधी कचरा वेचताना दिसतात, कधी भंगार गोळा करताना तर कधी बुट पॉलिश करताना दिसून येतात. त्यांच्याकडे आपले लक्ष जात असले तरी त्यांना मदत करण्याची भावना आपल्यात निर्माण होत नाही. बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात तर रात्रभर कुडकुडत झोपणाऱ्यांची संख्या अधिक असते. कडाक्याच्या थंडीमुळे किंवा ऊबदार कपड्याअभावी दरवर्षी चार ते पाच जणांचा मृत्यू होत असल्याची नोंद जिल्हा पोलीस प्रशासनाकडे आहे. त्यामुळे यावर्षीच्या हिवाळ्याच्या दिवसात थंडीमुळे कुणाचा नाहक जीव जावू नये. सामाजिक बांधिलकीतून आणि आपणही या समाजाचे घटक आहोत, या भावनेतून थंडीने कुडकुडणाऱ्यांना मदतीचा हाथ द्या, एवढेच.
थंडीत कुडकुडत्यांना द्या माणुसकीची उब!
By admin | Published: November 24, 2015 2:08 AM