बाराभाटी : जवळील ग्राम येरंडी-देवलगाव येथे रोजगार हमी योजनेंतर्गत कालव्याचे काम सुरु करण्यात आले आहे. कामावर जाणाऱ्या मजुरांचे नाव ऑनलाईन हजेरीपटावर आले. पण रेवचंद मारोती नंदागवळी यांचे नाव संगणक चालकाच्या अनागोंदी कारभारामुळे हजेरीपटावर आलेच नाही. यामुळे पंचायत समिती येथील संगणक चालक खोटेले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नंदागवळी यांनी केली आहे.
येरंडी-देवलगाव येथे मंगळवारपासून रोजगार हमी योजनेंतर्गत लहान कालव्याचे काम सुरु करण्यात आले आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम नाही, आणि रोजगार हमी योजनेचे काम कसे तरी मिळत असल्याने या कामावर गावातील मजूर काम करीत आहेत. या सर्व मजुरांचे नाव ऑनलाईन हजेरी पटावर टाकण्यात आले आहे. मात्र रेवचंद नंदागवळी यांचे नाव ऑनलाईन हजेरीपटावर आलेले नाही यामुळे आता त्यांची साप्ताहिक मजुरी गेली. शासकीय नियमानुसार रोजगार सेवकाने कामासाठी मजुरांची मागणी केली व त्यात मजुराचे नावही असून सर्व बाबी पुर्ण आहेत. मग तांत्रिक अडचण येऊच शकत नाही. अशात हा सर्व घोळ संगणक चालक खोटेले याने केल्याचे दिसते. संगणक चालकाला विचारणा केली असता कोणतेही कारण सांगत असून माझ्या हातात नाही असे बोलतो. पण या योजनेचे काम हाच संगणक चालक करतो. या योजनेचे काम पाहणारे संगणक चालक हजेरीपट रजिस्टर ऑनलाईन काढण्यासाठी पैशांची पण करीत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे संगणक चालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.