वर्षभरात ३७ आवेदन प्राप्त : केवळ दोन प्रस्ताव मंजूर देवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटनेच्या स्थितीत शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना केवळ नावापुरतीच राहिली आहे. या योजनेबाबत माहितीच्या अभावामुळे अपेक्षेनुरूप शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांमध्ये या अपघात विमा योजनेच्या जागृतीचा अभावच दिसून येत आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये केवळ दोन आवेदनांना मंजुरी देण्यात आली आहे. शेती व्यवसायादरम्यान वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विद्युत करंट आदी प्राकृतिक दुर्घटना; रस्ता, वाहन अपघात तथा इतर कोणत्याही कारणांमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा शारीरिक अपंगत्वाच्या स्थितीत शेतकरी कुटुंबाला आर्थिक सहायतेसाठी राज्य शासनाद्वारे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. कृषी विभागानुसार, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या सन २०१६-१७ मध्ये केवळ ३७ आवेदन प्राप्त झाले होते. यापैकी केवळ दोन आवेदन मंजूर करण्यात आले आहेत. नऊ प्रस्तावांमध्ये त्रुट्या आढळल्या आहेत, तर सहा पूर्ण प्रस्ताव होते. दुर्घटनेमुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्नाचे मार्गच बंद होवून जाते व कुटुंबाला समस्यांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत दुर्घटनाग्रस्त शेतकरी व त्याच्या परिवाराला आर्थिक लाभासाठी कोणत्याही प्रकारची स्वतंत्र योजना नसल्यामुळे राज्य शासनाने सन २००५-०६ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू केली होती. यानंतर सन २००९-१० मध्ये या योजनेला शेतकरी जनता अपघात विमा योजना नाव देण्यात आले होते. सन २०१५-१६ मध्ये योजनेला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना नाव देण्यात आले. योजनेंतर्गत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये, अपघातात दोन्ही डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये तथा एक डोळा किंवा एक अवयक निकामी झाल्यास एक लाख रूपयांच्या आर्थिक मदतीची तरतूद आहे. योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्याजवळ सातबारा, ८ अ, ६ क प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे वयोगट १० ते ५० वर्षांदरम्यान असावे. वयासाठी तसे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. बँक खात्याची पासबुक असणे आवश्यक आहे. अपंगत्व आल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे आहे. सात तालुक्यातून एकही लाभार्थी नाही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी जिल्ह्याच्या गोंदिया तालुक्यातील दोन, गोरेगाव चार, तिरोडा दोन, देवरी एक, सालेकसा दोन, आमगाव दोन व सडक-अर्जुनी तालुक्यातील पाच शेतकरी परिवारांद्वारे आवेदन करण्यात आले होते. यापैकी गोंदियातील दोन, गोरेगाव एक, तिरोडा एक, देवरी एक व आमगाव येथील एक प्रस्ताव पूर्ण आढळला. गोरेगाव तालुक्यातील तीन, तिरोडा येथील एक, आमगाव येथील एक व सडक-अर्जुनी तालुक्यातील दोन प्रस्तावांमध्ये त्रुट्या आढळल्या. त्यामुळे केवळ सडक-अर्जुनी तालुक्यातील दोन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे, तर उर्वरित सातही तालुक्यातून एकही लाभार्थी नाही.
अपघात विमा जागृतीचा अभाव
By admin | Published: June 29, 2017 12:50 AM