ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
सालेकसा : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. हाच प्रकार अन्य व्यवसायांबाबतही दिसून येत असून, ग्रामीण कारागिरसुद्धा अडचणीत आहेत.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
नवेगावबांध : वन्य, हिंस्र प्राण्यांकडून शेतशिवार व गाव परिसरात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करणे सुरुच आहे. हिंस्त्र प्राण्यांच्या धुमाकुळामुळे जंगलप्रवण व त्याला लागून असलेल्या भागात अधिवास करणारे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. वन विभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. वन्यजीवांचे संरक्षण करणे गरजेचे असले तरी नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील मजुरांच्या हाताला काम द्या
अर्जुनी-मोरगाव : येथे नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून गेल्या ५ वर्षांत शहरातील एकाही मजुराला मग्रारोहयोची कामे मिळाली नाहीत. त्यामुळे मजुरांवर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे भविष्य व उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने शहरातील मजुरांना मग्रारोहयोची कामे देण्यात यावी, अशी मागणी राष्टवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाने केली आहे.
त्या शेतकऱ्यांना मिळाला रस्ता
गोरेगाव : वन विभागाने कम्पाऊंड केल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा रस्ता बंद झाला होता. तालुक्यातील ग्राम शहारवानी येथील या प्रकरणात जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष जितेंद्र कटरे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानंतर वन विभागाने रस्त्यासाठी जागा मोकळी केली. यामुळे २० ते २५ शेतकऱ्यांची अडचण दूर झाली असून, त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळाला आहे.
गुलाबी थंडीला झाली सुरुवात
देवरी : तापमानात घसरण झाल्याने मागील काही दिवसांपासून हवेत गारठा जाणवू लागला आहे. या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला व डोकेदुखीसारख्या आजारांमध्ये वाढ होत आहेत. रुग्णांमध्ये ८० टक्के प्रमाण बालकांचे असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
रस्ता खड्ड्यात
परसवाडा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोंडमोहाळी-अत्री-दवनीेवाडा रस्त्याचे काम ४ मार्च रोजी पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडून सांगण्यात आले आहे. पण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसून, ५ महिन्यात संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. अशातच अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बंधारा असूनही उपयोग नाही
सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम राका-सौंदड मार्गावरील चुलबंद नदीवर कोल्हापुरी बंधारा असून, त्याचा काहीच उपयोग घेतला जात नाही. परिणामी बंधाऱ्यावर फक्त पैशांची नासाडीच करण्यात आली का, असा प्रश्न पडतो.
कॉलनीतील पथदिवे बंद
गोंदिया : शहरातील विवेकानंद कॉलनीतील कित्येक पथदिवे मागील काही दिवसांपासून बंद आहेत. यामुळे कॉलनीत रात्री अंधाराचे साम्राज्य असून, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे, सिव्हील लाईन्स परिसरातही हाच प्रकार दिसून येतो. नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.