ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
सालेकसा : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. हाच प्रकार अन्य व्यवसायांबाबतही दिसून येत असून, ग्रामीण कारागीरसुद्धा अडचणीत आहेत.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
नवेगावबांध : वन्य, हिंस्र प्राण्यांकडून शेतशिवार व गाव परिसरात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करणे सुरूच आहे. हिंस्र प्राण्यांच्या धुमाकुळामुळे जंगलप्रवण व त्याला लागून असलेल्या भागात अधिवास करणारे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. वनविभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. वन्यजीवांचे संरक्षण करणे गरजेचे असले तरी नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील मजुरांच्या हाताला काम द्या
अर्जुनी-मोरगाव : येथे नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून गेल्या पाच वर्षांत शहरातील एकाही मजुराला मग्रारोहयोचे काम मिळाले नाही. त्यामुळे मजुरांवर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे भविष्य व उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने शहरातील मजुरांना मग्रारोहयोची कामे देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाने केली आहे.
रस्ता खड्ड्यात
परसवाडा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोंडमोहाळी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम ४ मार्च रोजी पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडून सांगण्यात आले आहे. पण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसून, पाच महिन्यात संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. अशातच अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बंधारा असूनही उपयोग नाही
सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम राका-सौंदड मार्गावरील चुलबंद नदीवर कोल्हापुरी बंधारा असून, त्याचा काहीच उपयोग घेतला जात नाही. परिणामी, बंधाऱ्यावर फक्त पैशाची नासाडीच करण्यात आली का, असा प्रश्न पडतो.
कॉलनीतील पथदिवे बंद
गोंदिया : शहरातील विवेकानंद कॉलनीतील कित्येक पथदिवे मागील काही दिवसापासून बंद आहेत. यामुळे कॉलनीत रात्री अंधाराचे साम्राज्य असून, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे, सिव्हील लाईन्स परिसरातही हाच प्रकार दिसून येतो. नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
सालेकसा : तालुक्यातील काही गावात व्यायामशाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र अजूनही काही गावात व्यायामशाळा नाही. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहे. मात्र भविष्यात गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी सोपे होईल.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकलगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधीसुद्धा पसरते. त्यामुळे या परिसरात घाणच घाण पसरून दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होते.
अर्धवट बांधकामाचा बसतोय फटका
गोरेगाव : गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर फाटक नसलेल्या ठिकाणी अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे़. त्यातच अपुऱ्या मनुष्यबळाअभावी रेल्वेमार्गावर फाटक उभारण्यास अडचण आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
सालेकसा : तालुक्यात अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. वीज प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.