ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
सालेकसा : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहेत. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. हाच प्रकार अन्य व्यवसायावर दिसून येत असून, ग्रामीण कारागीरसुद्धा अडचणीत आहेत.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
नवेगाव बांध : वन्य हिंस्रप्राण्यांनी शेतशिवार व गावपरिसरात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करून जखमी करणे किंवा त्या प्राण्यांना मृत:पाय करणे सुरू केले आहे. हिंस्र प्राण्यांच्या धुमाकूळामुळे जंगलप्रवण व त्यास लागून असलेल्या भागात अधिवास करणारे नागरिक चांगलेच भयभीत झाले असून, वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
महिनाभरात डांबरी रस्त्यावर खड्डे
आमगाव : परिसरात निम्म्याहून अधिक रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत डांबरीकरण करण्यात आले आहेत. बहुतांश डांबरीकरण रस्त्यावर महिनाभरात खड्डे पडले आहेत. या रस्त्यांना खड्ड्यात पॅचेस लावले जात आहेत. अल्प कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. या संपूर्ण रस्ते बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
रेतीमुळे घरकुलाचे स्वप्न अधांतरीच
सालेकसा : पर्यावरणाचे कारण सांगत शासनाने रेतीघाट लिलाव केलेले नाहीत. असे असतानाही याच शासनाने रस्ता तथा इमारत बांधकाम, घरकूल बांधकाम मंजूर केले आहेत. रेतीला परवानगीच नाही तर ही कामे होणार तरी कशी, असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे. अशातच काही रेती तस्कर चांगलाच फायदा घेत आहेत. सर्रास रेतीची चोरी करून वाहतूक सुरू आहे. अव्वाच्या सव्वा दराने रेती विक्री होत असल्याने बांधकाम कसे करावे असा प्रश्न पडला आहे.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
देवरी : परिसरातील शेतशिवारात अनेक मोकाट कुत्री असून, ती एकटी महिला किंवा पुरुष पाहून हल्ला करतात. पाळीव जनावरांनाही ती जखमी करीत आहेत.
उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहन बाहेर काढणे कठीण होत आहे.
ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यात वाढ
गोरेगाव : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. काही गावात चोरटे भरदिवसा शिरून चोरी करीत आहेत. यामुळे लहान व्यावसायिकांत भीती आहे.
रस्त्यावरील बांधकाम साहित्याने अपघात
गोंदिया : बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकले जाते. रेती, गिट्टी, लोखंड रस्त्यावर पडून राहत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रेतीवरून अनेक वाहने घसरून पडत आहेत.
तंटामुक्त समितींचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष
गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंतर्गत तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीस रूपात रक्कम दिली. मात्र रक्कम मिळाल्यानंतर समित्यांचे तंट्यांकडे दुर्लक्ष आहे.