ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
अर्जुनी मोरगाव : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहेत. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. हाच प्रकार अन्य व्यवसायांबाबतही दिसून येत असून, ग्रामीण कारागीरसुद्धा अडचणीत आहेत.
शहरातील मजुरांच्या हाताला काम द्या
गोरेगाव : येथे नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून गेल्या पाच वर्षांत शहरातील एकाही मजुराला मग्रारोहयोचे काम मिळाले नाही. त्यामुळे मजुरांवर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे भविष्य व उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने शहरातील मजुरांना मग्रारोहयोची कामे देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाने केली आहे.
कॉलनीतील पथदिवे बंद
गोंदिया : शहरातील विवेकानंद कॉलनीतील कित्येक पथदिवे मागील काही दिवसांपासून बंद आहेत.
बंधारा असूनही उपयोग नाही
सडक अर्जुनी : तालुक्यातील ग्राम राका-सौंदड मार्गावरील चुलबंद नदीवर कोल्हापुरी बंधारा असून, त्याचा काहीच उपयोग घेतला जात नाही.
बैलबाजारांना उतरती कळा
गोंदिया : एकेकाळी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील बैलबाजार सध्या आपले मोल हरवून बसल्याचे दिसत आहे. यांत्रिक शेतीमुळे बैलजोड्या विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
भररस्त्यावर जनावरांचा ठिय्या
गोरेगाव : शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात
परसवाडा : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत गोंडमोहाडी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम ४ मार्च रोजी पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
सुरक्षाकवचाविना डीपी धोकादायक
सालेकसा : तालुक्यात अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. वीज प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. धोेक्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट
गोंदिया : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
आमगाव : शेतशिवारात अनेक मोकाट कुत्री असून, ही कुत्री एकटी महिला किंवा पुरुष पाहून हल्ला करतात. पाळीव जनावरांनाही ते जखमी करत आहेत. अशा अनेक घटना शिवारात घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यालयातून तक्रारपेट्या गायब
सौंदड : शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. तक्रारी निराकरण करण्यासाठी कार्यालयात तक्रारपेट्या लटकविलेल्या आज दिसत नाहीत.