गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर शासन जोर देत आहे. यातूनच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याने त्याचे परिणाम लसीकरणावर जाणवत आहे. मनुष्यबळ कमी झाल्यामुळे आरोग्य विभागाला लसीकरण पेलत नसल्याचे दिसत असून यामुळेच लसीकरण केंद्रांची संख्या घटविण्यात आली आहे. परिणामी नागरिकांना आता लस देण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्यानंतर आता तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात आहे. अशात तिसरी लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याची गरज आहे. यातूनच जिल्हयात सुमारे १९० लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी अन्यत्र जाण्याची गरज पडत नव्हती. मात्र आरोग्य विभागातील १४० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने आता आरोग्य विभागाला लसीकरणाची मोहीम पेलत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या झटकन कमी करण्यात आली आहे. अचानकच लसीकरण केंद्रांची संख्या कमी झाल्याने नागरिकांना आता लस घेण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे दिसत आहे. शिवाय केंद्र कमी झाल्याने मोजक्याच केंद्रांवर आता नागरिकांची गर्दी होत असून यातून तिसऱ्या लाटेला पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे. यातून आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागत आहे.
----------------------------
माहिती देण्यास लपवाछपवी
लसीकरणाची जबाबदारी डॉ. भूमेश पटले यांच्याकडे देण्यात आली होती व त्यांच्याकडून पूर्णपणे सहकार्य मिळत होते. मात्र त्यानंतर आता हीच जबाबदारी डॉ. चांदेकर यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यांना संपर्क केला असता ते फोन उचलत नाही. अशात माहिती कुणाकडून घ्यायची असा प्रश्न पडतो. एकंदर आरोग्य विभागाकडून आपल्या कमजोरीवर पडदा टाकण्यासाठी लपवाछपवी केली जात असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
--------------------------------------
शहरात फक्त केटीएस रूग्णालयातच लसीकरण
शहरात नगर परिषदेच्या शाळा, शासकीय रूग्णालय यासह शिबिरांचे आयोजन करून लसीकरणाला गती दिली जात होती. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यानंतर आता ही व्यवस्था कोलमडली आहे. परिणामी फक्त केटीएस रूग्णालयातच लसीकरण सुरू आहे. अशात आता लसीकरणासाठी नागरिकांची तेथे गर्दी होत असून अव्यवस्था होत आहे. याचा परिणाम लसीकरणावर पडत आहे.