लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता बाधितांची संख्या १३३९९ पर्यंत पोहचली आहे. तर यातील १२९१८ रूग्ण या आजारावर मात करून आपापल्या घरी पोहचले आहेत. मात्र कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रूग्णांमध्ये अन्य काही त्रास जाणवत असून अशा रूग्णांना वैद्यकीय भाषेत पोस्ट कोविड रूग्ण म्हटले जाते. अशा रूग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतरही उपचाराची गरज असून त्यांच्यावर आरोग्य विभागाची नजर असणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात पोस्ट कोविड रूग्णांना काही त्रास जाणवत असल्यास हे जाणून घेण्यासाठी काही सुविधा नाही. शिवाय त्यांची विचारपूस करण्याचीही सोय नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १२९१८ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून एवढ्या रूग्णांवर नजर ठेवणे शक्य नाही. अशात त्यांना काही त्रास जाणवत असल्यास त्यांनीच वैद्यकीय महाविद्यालयातील ओपीडीत जावून चाचणी करणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, यासाठी महाविद्यालयात मनोरोग विभागातून समुपदेशन केले जात आहे. शिवाय फिजियोथेरपी विभाग तयार करण्यात आला असून रूग्णांना काय काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले जात आहे.
काय काळजी घेतली जातेपोस्ट कोविड रूग्णांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात मनोरोग समुपदेश विभाग तयार करण्यात आला आहे. तसेच फिजियोथेरपीसाठी विभाग तयार करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या रूग्णांचा त्यांची समस्या जाणून त्यानुसार उपचार ठरविला जातो. एवढेच नव्हे तर त्यांना कोरोनानंतरही काय काळजी घ्यावी यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत.
रूग्णांनी संपर्क साधावाकोरोनातून बरे झाल्यानंतर रूग्णांना काही त्रास जाणवत असल्यास त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील ओपीडीमध्ये यावे. अशा रूग्णांसाठी समुपदेशन केंद्रासह फिजियोथेरपी विभाग तयार करण्यात आला आहे. तज्ज्ञ अशा रूग्णांना मार्गदर्शन करीत आहेत. डॉ. नरेश तिरपुडे अधिष्ष्ठाता, शास.वैद्यकीय महाविद्यालय