जिल्हा परिषद : निष्काळजीपणा व हलगर्जीपणाचा कळसलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधनच नसल्याचे दिसून आले. गुरूवारी (दि.८) सकाळी ११ ते ११.३० वाजतापर्यंत जिल्हा परिषदेच्या दालनात २५ टक्केसुद्धा कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. या प्रकारावरून जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी आपल्या मनमर्जीचे मालक झाले आहेत, असेच दिसून येते. वेळेबाबत तर त्यांनी निष्काळजीपणा व हलगर्जीपणाचा कळसच गाठला आहे. सकाळी १० ते १०.३० पर्यंत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात उपस्थित असणे आवश्यक असते. मात्र गुरूवारी कार्यालयास भेट दिली असता सर्वच विभागात ५० टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारी उपस्थित होते. सर्वात कमी संख्या शिक्षणाधिकारी कार्यालयात दिसून आली. येथील प्राथमिक व माध्यमिक विभागात प्रत्येकी तीन सहायक उपस्थित होते. प्राथमिक विभागात दोन सहायक, एक सहायिका व एक परिचर तर माध्यमिक विभागात तीन सहायक उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, अर्थ विभाग यासह अनेक विभागात निम्म्याहून कमी कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक व माध्यमिक विभागाचे दोन्ही शिक्षणाधिकारी उपस्थित नव्हते. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचाच असा भोंगळ कारभार असेल तर इतर विभागांचा तथा कार्यालयांचा कसा असावा, हे लक्षात घेण्यासारखे आहे. कार्यालयात उशिरा येण्यामागे सर्वात मोठे कारण रेल्वे प्रवास आहे. अधिकारी-कर्मचारी हे विदर्भ एक्सप्रेसने नागपूर, भंडारा, तुमसर, तिरोडा येथून येतात. तर आमगाव व सालेकसाकडून येणारे दुर्ग लोकल व हावडा-कुर्ला एक्सप्रेसने येतात. त्यामुळेच ११ वाजता ९० टक्के अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून येतात. याशिवाय काही अधिकारी-कर्मचारी तर पक्के विदर्भवीर आहेत. विदर्भ एक्सप्रेसने दुपारी १२ पर्यंत कार्यालयात पोहोचतात व दुपारी ३ वाजता विदर्भ एक्सप्रेसने जाण्याच्या तयारीत असतात. तर काही कर्मचारी आल्याआल्या संगणकावर बसून परतीच्या प्रवासासाठी विदर्भ एक्सप्रेस, हावडा-अहमदाबाद आदी गाड्यांची पोझिशन बघत बसतात. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर विपरित परिणाम होत असून उर्वरित कामाची गत ‘आज करे सो कल, कल करे सो परसो’ अशी होते.ग्रामीण नागरिकांची भेट घेण्यास टाळाटाळनागरिकांची भेट घेण्यास टाळाटाळ पदाधिकाऱ्यांचा वचक नसल्याने अधिकारी व कर्मचारी मनमर्जीचे मालक झाले आहेत. अधिकारी-कर्मचारी प्रवासामुळे कंटाळून जातात. त्यामुळे कार्यालयात आल्यावर कामावर मन लागत नाही. या प्रकारामुळे ते ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची भेट घेण्यास टाळाटाळ करतात. कार्यालयात येताच स्वाक्षऱ्या करण्याची औपचारिकता पूर्ण करून पुन्हा परत जाण्यासाठी फोन व संगणकावर इंटरनेटकडे वळतात. त्यामुळे नागरिकांची महत्वाचे कामे वेळेत पूर्ण होत नाही. विभागाद्वारे गरजेची कामे पूर्ण केली जात नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकडे लक्ष घालून प्रशासनात सुधारणा घडवून आणावी, अशी मागणीसुद्धा सर्वसामान्य जनतेने केली आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये वेळेच्या बंधनाचा अभाव
By admin | Published: June 09, 2017 1:25 AM