धानपीक पाण्याविना : अभियंत्यावर कारवाईची मागणी सुकडी (डाकराम) : पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचा दुरूपयोग टाळावा, असा संदेश दिला जातो. मात्र सध्या या संदेशाच्या विपरित बाबी घडत असल्याचे परिसरात दिसून येते. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयाचे पाणी शेतामध्ये धानाला न जाता खुलेआम नाल्यामध्ये वाहत असल्याचे दिसून येते. याकडे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत आहे. एकीकडे रबीसाठी धानाला पाणी नाही व दुसरीकडे नाल्याला पूर वाहते, अशी स्थिती बुचाटोला नाल्याची आहे. तिच स्थिती पेंढरी तलावाच्या कापून धोडीची आहे. बोदलकसा तलावाचे पाणी उन्हाळी पिकासासाठी पिंडकेपार, बोदलकसा, डोंगरगाव, खमारी, चिखली व सुकडी या गावातील अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाले. त्यांनी उन्हाळी पिकांचा फायदा घेतला. बोदलकसा तलावामध्ये १६ फूट पाणी होते. त्या १६ फूट पाण्यामध्ये १० वर्षाअगोदर १६ फूट पाण्यामध्ये उजवा कालव्याचे रुस्तमपुर, इंदोरा, निमगाव, मेंदीपूर, भिवापूर व बरबसपुरा, डाव्या कालव्याचे बोदलकसा, बुचाटोला, पिंडकेपार, सुकडी, रावणघाटा, मेंढा, डोंगरगाव, खमारी व चिखली या गावांना उन्हाळी धानासाठी पाणी मिळत होते. पण यंदा शाखा अभियंता त्रिभूवन कापसे यांनी डाव्या कालव्याचे बोदलकसा, पिंडकेपार अर्धे, खमारी, चिखली, सुकडी अर्धे व डोंगरगाव अर्धे अशाप्रकारे उन्हाळी धान पिकासाठी पाणी देण्याचे नियोजन केले. या आधी १६ फूट पाण्यामध्ये दोन्ही कालव्याद्वारे जवळपास सर्व गावांना उन्हाळी धानासाठी पाणी मिळत होते. पण शाखा अभियंता कापसे यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक गावांना उन्हाळी धानपिकापासून वंचित ठेवले आहे. आता बुचाटोला नाला व सुकडीच्या कापूर धोडीला पूर वाहात आहे. राष्ट्रीय संपत्तीचा दूरपयोग खुलेआम होत आहे. त्याकडे कोणत्याच अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. पाण्याचा दुरूपयोग व गैरवापर होत असेल त्यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सद्यस्थितीत सर्वत्र पाण्याचा अभाव दिसून येतो. एकीकडे पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू आहे. तर दुसरीकडे नाल्याद्वारे पाण्याचा वेस्टेज सुरू आहे. शाखा अभियंता त्रिभूवन कापसे यांच्या सांगण्यानुसार, शेतकरी पाण्याचा वापर बरोबर करीत नाही आणि पाणी जनावरांना पिण्यासाठी नाल्याला वाहाणे महत्वाचे आहे. ती आमची जबाबदारी नाही. कुणीच पाणी पाहण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले नाही, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
जलाशयातील पाण्याची नासाडी
By admin | Published: May 05, 2017 1:43 AM