इंदोरा/बु. : तिरोडा तालुक्यातील धादरी-उमरी गावात मोहफुलांची दारू व देशी दारूवर बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. त्यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, महिला मंडळ व महिला बचत गटांनी पुढाकार घेतला. व्यसनमुक्त गाव बनविण्यासाठी पोलीस पाटील मंगला उके यांच्या नेतृत्वात गावातील महिलांनी पुढाकार घेतला. गावात अवैधरीत्या दारू विकणाऱ्यांची दुकानदारी बंद करून गावात कुणीही दारू पिणार नाही, तसेच बाहेरगावावरून दारू पिऊन येणार नाही, याबाबत ग्रामसभेत ठराव घेऊन लोकांना तशी ताकीद देण्यात आली. दारू पिणे आणि विकणे यामुळे गावात अशांतता पसरली होती. दारू पिऊन काही लोक गावात अशांतता निर्माण करीत होते. स्वत:च्या घरच्याच महिलांना त्रास देवून स्वत:चा संसार उध्वस्त करण्यास मागे-पुढे पाहत नव्हते. गावातील दारूड्या व्यक्तींपासून पोलीस पाटील मंगला उके यासुद्धा त्रासल्या होत्या. यातूनच त्यांनी गावात दारूबंदीचा ठराव पारीत करून घेऊन महिलांच्या सहकार्याने गावात संपूर्ण दारूबंदी केली. दारूबंदी झाल्यापासून गावात कुणीही दारू विक्री करीत नाही. गावातील तरूणमंडळी व शाळकरी विद्यार्थी या निर्णयामुळे आनंदीत असल्याचे सांगण्यात येते. तिरोड्याचे ठाणेदार वसंत लब्दे यांनी या गावाला भेट देऊन सभा घेतली. यावेळी त्यांनी गावात कुणीही दारू विक्री करेल किंवा दारू पिऊन दंगा करेल, त्याचवेळी आम्हाला कळवा. दारूबंदीसाठी आमचे सहकार्य वेळोवेळी राहील, अशी हमी दिली. आता गावातील कोणताही सण-उत्सव पोलिसांच्या बंदोबस्ताविनाच साजरा होत आहे. त्यामुळे महिलावर्ग आनंदात आहे. (वार्ताहर)
धादरी-उमरीत महिलांच्या सहकार्याने दारूबंदी
By admin | Published: September 15, 2014 12:12 AM