दुर्ग-इतवारी गाडीतील प्रकार : महिलांच्या डब्यात बसणे भोवलेसालेकसा : दुर्ग-इतवारी (क्रमांक ६८७४१) गाडीतील महिलांच्या डब्यात बसलेल्या पुरूषांना सालेकसा ते गोंदिया या प्रवासाकरिता प्रत्येकी ३०० रूपयांचा दंड ठोठावून पाच तास कोंडून ठेवण्यात आले. रविवारी (दि.३) घडलेल्या या प्रकारामुळे मात्र प्रवासीवर्गात चांगलाच रोष व्याप्त आहे. सुमारे ४० प्रवाशांसोबत घडलेल्या या प्रकारातील दर्शन जैन नामक प्रवाशांनी सांगितले की, ते आपल्या कामानिमित्त नेहमीप्रमाणे रविवारी (दि.३) सकाळी ९ वाजता सालेकसा येथून दुर्ग-इतवारी गाडीने गोंदियासाठी बसले. एवढ्यात तिकीट तपासणी करणाऱ्यांचे पथक सुद्धा गाडीत दाखल झाले. पथकाने प्रत्येकांची तिकीट तपासली व त्यावेळी काही म्हटले नाही. मात्र गोंदिया स्टेशनवर गाडी थांबताच पथकाने महिलांच्या डब्यात बसलेल्या सर्व पुरूष प्रवाशांना मॅजिस्ट्रेट चेकींग असल्याचे सांगत ३०० रूपयांचा दंड वसुल केला. एवढेच नव्हे तर सर्व प्रवाशांना १० वाजतापासून दुपारी ३ वाजतापर्यंत एका खोलीत कोंडून ठेवले. पोलिसांची मदत घेऊन खोलीत ठेवण्यात आलेल्या या प्रवाशांना पाच तास कोणताही आहार व पाण्यापासून वंचीत ठेवण्यात आले. भूख व तहानेने व्याकूळ या प्रवाशांवर कोणतीही दया दाखविण्यात आली नाही. तर दुसरीकडे ज्या कामानिमित्त हे प्रवासी गोंदियाला आले होते ते कामही होऊ शकले नाही. महिलांच्या डब्यातून प्रवास केल्याबद्दल दंड ठोठावणे योग्य होते. मात्र त्यानंतर पाच तास खोलीत कोंडून ठेवणे हा प्रकार अनुचीत आहे. या प्रकारामुळे मात्र सर्व प्रवासी व त्यांचे कुटूंबीय कमालीचे नाराज झाले आहेत.(तालुका प्रतिनिधी)
महिलांच्या डब्यातील प्रवाशांना पाच तास कोंडले
By admin | Published: April 06, 2016 2:04 AM