लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहे. परिणामी तलावांच्या जिल्ह्यातच यंदा एप्रिल महिन्यातच पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने पाणीे टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तर तलावात पाणी नसल्याने मत्स्य व्यवसायावर संकट निर्माण झाले आहे.यावर्षी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा ४३ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे याचा दैनदिन कामकाजावर सुध्दा परिणाम होत आहे. तर यंदा एप्रिल महिन्यात सिंचन प्रकल्प व तलाव कोरडे पडल्याने मत्स्य व्यवसायाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत असल्याने मत्स्यपालन संस्थाना चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यात माजी मालगुजारी (मामा) तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तलावांचा उपयोग मासेमारी करण्यासाठी केला जातो.त्यामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो. जिल्ह्यात जि.प.च्या मालकीचे एकूण ६ हजार ८३९ लघु तलाव आहेत. तर २०० हेक्टर क्षेत्राचे १० आणि २०० हेक्टरपेक्षा कमी क्षमतेचे ५६ तलाव आहेत. जिल्ह्यात १३३ नोदंणीकृत मत्स्यपालन संस्था आहेत. जि.प.व सिंचन विभागातर्फे तलावांचा लिलाव करुन अथवा लिजवर तलाव मत्स्यपालन संस्थेला दिले जाते. यामुळे शासनाला सुध्दा दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो. जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी ११३४ मि.मी.पाऊस पडतो. तर तलावांची संख्या अधिक असल्याने या दोन्ही गोष्टी मत्स्यपालनासाठी अनुकुल आहेत.या व्यवसायामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो. मात्र मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ९५० मि.मी.पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा तापमानात सुध्दा प्रचंड वाढ झाली असून पाण्याचे लवकर बाष्पीभवन होत असल्याने तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होवून तलाव कोरडे पडत आहे. तर जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणीसाठा आहे.
तलावातील गाळ व खोलीकरणाकडे दुर्लक्षशासनाने जलयुक्त शिवारच्या धर्तीवर गाळमुक्त तलाव योजना अंमलात आणली. मात्र या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने जिल्ह्यातील शेकडो तलावातील गाळाची समस्या कायम आहे. मागील अनेक वर्षांपासून तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी केली जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले असल्याने तलावांच्या सिंचन क्षमतेत घट होत आहे.
लिजचे पैसे निघणे कठीणजिल्ह्यात एकूण १३३ नोंदणीकृत मत्स्यपालन संस्था आहेत. या संस्थानी हजारो रुपये शासनाकडे भरुन मत्स्यपालनासाठी तलाव लिजवर घेतले आहेत. मात्र वाढत्या तापमानामुळे तलाव कोरडे पडत असल्याने मासे मृत्यूमुखी पडत असून लिजचे पैसे भरुन निघणे कठीण झाले आहे. तर यावर आधारित ७ हजार कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.