बोंडगावदेवी : गावातून जाणाऱ्या बाराभाटी मार्गावरील गावानजीक रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशा आशयाची बातमी गुरुवारच्या (दि.२६) अंकात ‘लोकमत’ने प्रकाशित केली. बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्जुनी-मोरगावचे गुरुवारी दुपारी रस्त्यावरील खड्डा बुजवून हा मार्ग रहदारीस सुरळीत केला.
बोंडगाावदेवी ते बाराभाटी मार्ग हा नित्यनेम वर्दळीचा आहे. मार्गावरून मोठ्या प्रमाणात आवागमन सुरू आहे. गावापासून काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडल्याने अपघाताचे केंद्रस्थान झाले होते. ऐन रहदारीच्या मार्गावर खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता नाकारता येऊ शकत नव्हती. या मार्गावर खड्डा पडल्याचे लक्षात येताच सरपंच प्रतिमा बोरकर यांनी बाराभाटी मार्गावरील रस्त्यावर पडलेला जीवघेणा खड्डा त्वरित बुजविण्यात यावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्जुनी-मोरगावला बुधवारला लेखी पत्रकातून केली होती. लोकमतला बातमी प्रकाशित होताच उपविभागीय अभियंता सोनुने यांनी प्राधान्यपूर्वक गुरुवारी दुपारी खड्डा बुजविला.