शेतकऱ्यांची उपस्थिती : शेतीबाबत मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : राज्याच्या कृषी विभागाच्या उन्नत शेती-समृध्द शेतकरी या अभियानांतर्गत रोहिणी नक्षत्रात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीचा प्रचार व प्रसार पंधरवाडाचा शुभारंभ पंचायत समितीच्या बचत भवनात आयोजित खास शेतकरी सभेच्या माध्यमातून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झरपडा येथील प्रगतीशील शेतकरी डॉ. उदाराम मुंगमोडे होते. उद्घाटन नाविण्यपूर्ण पीक घेणारे कुसन झोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषी अधिकारी एन.एच.मुनेश्वर, नवेगावबांधचे मंडळ कृषी अधिकारी संजय रामटेके, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.बी.उईके, कृषी पर्यवेक्षक आर.के.चांदेवार उपस्थित होते. सर्वप्रथम राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन व माल्यार्पणाने अभिवादन करून उन्नत शेती पंधरवाडा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी तज्ञांंनी विस्तृत असे मार्गदर्शन करून अभियानाबद्दल माहिती विशद केली. आपल्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना मौलीक सल्ला देताना कृषी अधिकारी म्हणाले की, दिवसेंदिवस शेती उत्पादनासाठी खर्चाचे प्रमाण वाढत आहे. शेती उत्पादनासाठी आवश्यक साधन सामुग्रीच्या किंमतीचे भाव दुपटीने वाढत आहे. याबाबीचा शेतकऱ्यांनी विचार करून कमी खर्चाची शेती करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. वडिलोपार्जीत शेतीला बदल देऊन आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याची तत्परता शेतकऱ्यांनी दाखवावी. जपानी पध्दतीने भाताची लागवड करावी. रासायनिक खताचा वापर कमी जैवीक, सेंद्रीय खताचा वापर शेतकऱ्यांना हितावह आहे. कृषी विभागाच्या सल्यानी शेतामध्ये नगदी पीक देणारे फळभाज्या, केळी, कारल्या, मका, टरबूज आदी पिकाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे. पिकावर येणाऱ्या किडीचा वेळीच बंदोबस्त करावा. कृषी उपयोगासाठी साहित्य घ्यावे, असे महत्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. अभियानाच्या पहिल्याच दिवशी अर्जुनी-मोरगाव, ईटखेडा, माहुरकुडा, वडेगाव-रेल्वे, नवेगावबांध, गोठणगाव, धाबेपवनी, चापटी, सिरोली, धाबेटेकडी, जांभळी इत्यादी गावात शेतकरी सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. संचालन विलास कोहाडे यांनी केले. प्रास्ताविक मुनेश्वर यांनी मांडले. आभार हुकरे यांनी मानले.
उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानाचा शुभारंभ
By admin | Published: June 02, 2017 1:28 AM