आरएफओ रहांगडाले : गावकऱ्यांना रोजगाराची संधी बोंडगावदेवी : गावाशेजारील जंगलाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकानी सहकार्य केले तर ग्रामस्थांना त्यापासून विविध फायदे मिळतात. जंगल वाढल्याने निश्चितपणे गावकऱ्यांना एक रोजगाराची संधी उपलब्ध होते. जंगलांच्या संगोपनातून नागरिकांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळतो. गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावकरी पुढे आले तर गावांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास कोणतीच अडचण भासणार नाही असा आशावाद अर्जुनी-मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी व्यक्त केला.येथील सहवनक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या तिडका येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने आयोजित केलेल्या मोहफुल खरेदी शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. तिडका येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात मोहफुल खरेदी समारंभाच्या अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी.रहांगडाले, येथील क्षेत्र सहाय्यक धुर्वे, वनरक्षक शिशुपाल पंधरे, पी.टी.दहिवले, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक लंजे, सरपंच आनंदराव मेश्राम, उपसरपंच शिवदास शहारे, तंमुस अध्यक्ष हेमराज उईके, फाल्गुन बाळबुध्दे, धनराज भोवते, जगजीवन भसाखेत्री, प्रमोद भोवते आदी मान्यवर उपस्थित होते. वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक लंजे यांच्या हस्ते वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले यांच्या उपस्थितीमध्ये काट्याची पूजा करून मोहफुल खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पुढे बोलताना रहांगडाले यांनी, गावकऱ्यांनी जंगलाची संपत्ती आपली समजून तिची देखभाल करण्यासाठी पुढे यावे. गावाजवळील जंगल परिसराला आग लागणार नाही याची दक्षता घ्यावी, निसर्गाच्या सान्निध्यात वावरणारा व्यक्ती सदैव सुदृढ राहतो. वनापासून गावकऱ्यांना विविध रोजगाराची संधी उपलब्ध होत असल्याने जंगलाचा वाढीबरोबरच संवर्धनासाठी पुढे येण्याचे आवाहन रहांगडाले यांनी केले. प्रास्ताविक क्षेत्र सहायक धुर्वे यांनी केले. संचालन वनरक्षक शिशुुपाल पंधरे यांनी केले.
वनव्यवस्थापन समितीच्या वतीने मोहफूल खरेदीचा शुभारंभ
By admin | Published: April 09, 2016 1:54 AM