गोरेगाव : आज सर्वत्र विद्यार्थ्यांविना शाळा, अशी परिस्थिती असल्यामुळे मुले घरीच आहेत. मागील दीड वर्षापासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असून विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झालेले आहे, याकरिता केंद्रप्रमुख आर. आर. अगडे यांनी ‘शाळा विद्यार्थ्यांच्या दारी’ या उपक्रमाची सुरुवात केंद्रातील १२ शाळांमध्ये केली आहे. त्याचा शुभारंभ ग्राम निंबा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेतून करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी एस. बी. खोबरागडे होते.
याप्रसंगी समग्र शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, विषय तज्ज्ञ सुनील ठाकूर, केंद्रप्रमुख आर. आर. अगडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव शिवणकर, मुख्याध्यापक आर. एच. नंदेश्वर, रमेश पंधरे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राजेंद्र बहेकार उपस्थित होते.
याप्रसंगी फ्लेक्सचे अनावरण बिसेन यांच्याहस्ते करण्यात आले. त्यांनी, हा उपक्रम सद्यपरिस्थितीत विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त असून जिल्ह्यातील शाळांना प्रेरणादायी ठरेल व याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यास सर्व शिक्षकांना आवाहन केले.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र पुस्तक, पाटी आणि लेखणी संच देण्यात आले. दरम्यान, मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संचालन राजेंद्र बंसोड यांनी केले. आभार कोहरे यांनी मानले.
------------------------------
तयार केले विशेष शैक्षणिक फ्लेक्स
‘शाळा विद्यार्थ्यांच्या दारी’ उपक्रमांतर्गत वर्ग १ ते ७ करिता उपयुक्त असलेल्या मराठी, इंग्रजी व गणित या प्रमुख विषयांवरील शैक्षणिक फ्लेक्स तयार करण्यात आले आहेत. गाव, वाड्या, वस्ती जिथे विद्यार्थी सहज पोहोचतील व अभ्यास करू शकतील, अशा ठिकाणी हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. शिवाय पालकांना सुद्धा आपल्या मुलांना शिकवण्यासाठी उपयुक्त ठरतील असे हे फ्लेक्स आहेत. या अभिनव उपक्रमाचा लाभ १२०० विद्यार्थ्यांना होत असून गावातील भिंतीला शैक्षणिक फ्लेक्स लावून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वर्ग १ ते ७ च्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे हे शैक्षणिक फ्लेक्स आहेत.