लोकसहभागाकडे दुर्लक्ष : अनेक रस्त्यांची दैनावस्थाकेशोरी : कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरूषांच्या नावावर राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाची संकल्पना अंमलात आणली. सुरुवातीच्या काळात ग्रामस्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे स्वच्छता अभियानाचे चांगले परिणाम समोर आले. महाराष्ट्राच्या धर्तीवर इतर राज्यांनी देखील स्वच्छता अभियान राबविले. परंतु महाराष्ट्रातच हे अभियान सपेशल ढेपाळल्याचे चित्र दिसायला लागले आहे. त्यामुळे स्वच्छ व सुंदर गावांचे दर्शन आता दुरापास्त झाले आहे. आजही गावातील अनेक रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसून येत आहेत. त्यामधून दुर्गंधी सुटत असते. बऱ्याच ठिकाणी शासकीय जागेवर अतिक्रमण करुन जागा बळकविण्याचा प्रयत्न नागरिकांकडून होताना दिसत आहे. याकडे प्रशासनाला लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलल्याचे दिसत आहे.किमान ज्या अधिकाऱ्यांवर गाव विकासाच्या जबाबदारीची धुरा आहे, ते अधिकारी, पदाधिकारी स्वच्छता किंवा स्वच्छता अभियानाविषयी काही बोलायला नाही. यासंबंधी गावातील सामान्य माणसांना तर त्याचे काही देणे-घेणे नाही. सुरुवातीच्या काळात ज्या गावांनी ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी होवून शासनाकडून रोख बक्षीस मिळविले, ते गावही आजच्या स्थितीत स्वच्छ राहिले नाही. गावातील स्थानिक सत्तेतील पदाधिकारी बदलले की गावाच्या सुधारणेचे अंदाज बदलले जातात. आपण सत्तेवरुन बाहेर गेलो की गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होतो, ही भावना उदयास येते. अस्वच्छता म्हणजे गावासाठी संकटे उभे करण्याचे साधन आहे. यामुळे कावीळ, मलेरिया, साथीचे आजार अशी स्थिती असते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अजूनही बरीच मंडळी रस्त्याच्या दुतर्फा उघड्यावर शौचास बसतात. पावसाळ्याच्या दिवसात हे पाणी नदी, नाल्यात जाते आणि अस्वच्छ पाण्यातून साथीच्या आजाराचा प्रसार होतो. या प्रकाराकडे शासन व प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
ग्राम स्वच्छता अभियान ढेपाळले
By admin | Published: March 03, 2017 1:28 AM