बाराभाटी : सामान्यांच्या सेवेसाठी ही सेवा आणि योजना घराघरात पोहोचवावी अशी शासनाची कार्यप्रणाली आहे, परंतु या प्रणालीकडे विभागाचे कारकून हे गंभीरतेने लक्ष देत नाही. असाच प्रकार साकोली आगारातून धावणाऱ्या बसेससंदर्भात होत आहे. साकोली आगारातून अर्जुनी मोरगावला जाणाऱ्या सर्व बसेस खांबीमार्गे सोेडण्याची मागणी विद्यार्थी व नागरिकांनी केली आहे.
साकोलीवरून अर्जुनी मोरगावला जाणाऱ्या सर्व एसटी बसेस महागाव, प्रतापगड, दिनकरनगर, केशोरी या सर्व बसेस खांबीमार्गे जात नाही, ही फार मोठी खंत व्यक्त होत आहे. या सर्व बसेस खांबीमार्गे सोडण्याची मागणी अनेकदा करण्यात आली, पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली. साकोली आगाराचे सातत्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. खांबीमार्गे बसेस धावत नसल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, असे शासनाने धोरण आहे, पण याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही. साकोलीवरून अर्जुनी मोरगावमार्गे धावणाऱ्या बसेस खांबीमार्गे सोडल्या नाहीत, तर या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
-------
आम्ही अनेकदा या मार्गावरच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, या सर्व बसेस खांबीवरून धावल्याच पाहिजेत, असा आग्रह असून, प्रवाशांना सोयीचे होईल.
- प्रभाकर दहीकर, सामाजिक कार्यकर्ता
....
आमच्या परिसरातील अनेक विद्यार्थी बोंडगाव, सानगडी व साकोली येथे शिकायला जातात, त्यांना ये-जा करण्यासाठी पुरेशा बसेस नाही, तर याची एसटी महामंडळाने दखल घ्यावी.
- दिलवर रामटेके, अध्यक्ष, राष्ट्रीय संविधान सेना येरंडी