लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तिरोडा तालुक्यातील वडेगाव माल्ही परिसरातील एका नाल्याजवळ एक बिबट मृतावस्थेत आढळल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील वडेगाव माल्ही परिसरातील नाल्या लगत असलेल्या मैदानावर माल्ही येथील मुले बुधवारी क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांना नाल्यालगत एक बिबट मृतावस्थेत आढळला. त्यांनी याची माहिती सरपंच व गावकऱ्यांना दिली. यानंतर सरपंच व गावकरी घटनास्थळी पोहचले व या घटनेची माहिती तिरोडा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. ज्या ठिकाणी बिबट मृतावस्थेत आढळला तो परिसर कोडेलाेहारा बीट अंतर्गत येत असून या परिसरात वनविभागाची नर्सरी आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बिबट्याचा मृत्यू हा तीन चार दिवसांपूर्वीच झाल्याचे बोलल्या जाते. माल्हीचे सरपंच संजय रहांगडाले यांनी याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी आकरे यांना दिली. त्यांनी लगेच वनरक्षक व एका चौकीदाराला घटनास्थळी पाठविले होते. मात्र सायंकाळी उशीर झाल्याने मृत बिबट्याचे श्वविच्छेदन करण्यात आले नव्हते. त्यामुळे बिबट्याचे मृत्युचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.