शेंडा-कोयलारी (गोंदिया) - सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा वन क्षेत्रांतर्गत येणाºया कोयलारी परिसरात रविवारी (दि.६) सायंकाळी १ व सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास १ बिबट्याचा बछडा सापडला. यापैकी रविवारी सुन्न अवस्थेत सापडलेल्या बछड्याचा मंगळवारी (दि.७) सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान उपचारा दरम्यान मृत्यू झाला. साकोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याचे श्वविच्छेदन करण्यात आले. श्वविच्छेदन अहवालानुसार सदर बछड्याचा मृत्यू भूकेने झाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार शेंडा येथील शेतकरी किशोर लांजेवार यांची कोलायरी परिसरात शेती आहे. रविवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांच्या शेतातील मोहाच्या झाडाखाली बिबट्याचा एक बछडा बेशुध्द अवस्थेत आढळला होता. त्यांनी लगेच याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना दिली. वनक्षेत्राधिकारी गोवर्धन राठोड यांनी घटनास्थळी पोहचून सदर बछड्याला साकोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास या बछड्याचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत सदर बछड्याचे श्वविच्छेदन डॉ.वाघाये यांनी केले.पशुवैद्यकीय अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार या बछड्याचा मृत्यू भूकेमुळे झाला. सापडलेला दोन बछड्यांपैकी दुसरा बछडा सुखरुप असून त्यांच्यावर साकोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गोंदियात बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 7:21 PM