सडक अर्जुनी : तालुुक्यातील कोसबी परिसरात मागील आठ दहा दिवसांपासून एका बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने पाच सहा जनावरांची शिकार केली होती. त्यामुळे पशुपालक आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या बिबट्याला कोसबी गावात वन विभागाच्या चमूने गुरुवारी (दि.१३) रात्री ८ वाजताच्या सुमारास जेरबंद केले. त्यामुळे गावकऱ्यांना सुटकेचा निश्वास टाकला.
सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोहमारा सहवन क्षेत्रातील कोसबी गावात गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भीमराव शालिग्राम गहाणे यांच्या घरात बिबट्याने ठाण मांडले होते. याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. रात्री ८ वाजताच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव, वन्यजीवचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र सावंत, क्षेत्र सहाय्यक नरेंद्र वाढई, वनक्षेत्र सहाय्यक वलथरे, डव्वाक्षेत्र सहाय्यक युवराज ठवकर , आनंद बनसोड वनरक्षक तरुण बेलकर राजेश्वर उईके, संजय चव्हाण, नरेश पाथोडे, दीपक बोधलकर, बिंदू रहांगडाले, दिलीप माहुरे,पुरुषोत्तम पटले, वनमजूर किशोर बडवाईक यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले.