आपत्ती व्यवस्थापन व अदानी पॉवरचा उपक्रम : लोकांत जनजागृतीचे प्रयत्न गोंदिया : गोंदिया येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या हॉटेल बिंदल प्लाझाला २१ डिसेंबर २०१६ ला पहाटे आग लागली. या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुदैवी घटनेमुळे आग प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा प्रश्न निर्माण झाला. आगीवर मात करण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करण्यासोबतच आग प्रतिबंधाचे धडे ‘मॉकड्रिल’ मधून शहरवासीयांना देण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि अदानी पॉवर लिमिटेड यांच्या संयुक्तवतीने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला. येथील बाजारपेठेत असलेल्या हॉटेल रेनबो येथे आग प्रतिबंधाबाबतची रंगीत तालीम घेण्यात आली. हॉटेल रेनबोला आग लागलेली आहे आणि या हॉटेलमध्ये अडकलेल्या व्यक्तींना आगीतून सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आग आटोक्यात लवकर आणण्यासाठी फोम फायर व पाण्याचा वापर तसेच आगीत अडकलेल्या व्यक्तींना खिडकीतून सुरक्षीत काढण्यासाठी सीडी (निशानी) लावण्यात आली. आगीतील धुरामुळे हॉटेलमध्ये बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला स्ट्रेक्चरवरुन रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी आगीतून सुरक्षीत बचावलेल्या व्यक्तींची गणना करण्यात आली. यामधून खात्री करण्यात आली की सर्व लोक सुरक्षीत खाली आलेले आहेत. आगीतून व्यक्तींना सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी आॅक्सिजन सिंलेंडरचा वापर, मास्क, हेल्मेट, विशीष्ट गणवेश धारण करुन प्रात्यक्षिके करण्यात आली. आपातकालीन स्थितीत पोलिसांकडून मदतीसाठी १००, अग्निशमनासाठी १०१ आणि रुग्णवाहिकेसाठी १०२ व १०८ या नंबरची माहिती विस्तृतपणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी यावेळी दिली. अदानी पावर महाराष्ट्र लिमिटेडचे मुख्य सुरक्षा अधिकारी त्रिलोकसिंग यांनी देखील करण्यात येत असलेल्या प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. आग प्रतिबंधाच्या रंगीत तालीमेसाठी हॉटेल रेनबोचे संचालक विकेश सोनछात्रा व संजय जैन यांनी हॉटेल उपलब्ध करुन दिले. हॉटेल रेनबो येथील रंगीत तालीम प्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश परबते, तहसीलदार अरविंद हिंगे, अप्पर तहसीलदार के.डी.मेश्राम, पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला, पाटील, सांडभोर, शहरातील विविध हॉटेल, लॉज, दुकाने यांचे संचालक व त्यांचा कर्मचारी वर्ग, गोंदिया नगर परिषद अग्निशमन दलाचे अश्निशमन अधिकारी प्रकाश कापसे, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
‘मॉकड्रिल’ मधून दिले आग नियंत्रणाचे धडे
By admin | Published: January 21, 2017 12:37 AM